IPS Transfers
महाराष्ट्रात जिल्हा पोलिसांची मान उंचावलेले पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची बदली नाशिकच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक पदावर झाली आहे. बाळासाहेब पाटील यांच्या कार्यकाळात पालघर जिल्हा पोलीस दलाला महाराष्ट्रात चांगली ओळख मिळाली. गडचिरोली येथील अभियानाचे अप्पर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांची पालघर जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून वर्णी लागली आहे.
बाळासाहेब पाटील यांच्या कार्यकाळात राज्य शासनाच्या 100 दिवस लोकाभिमुख प्रशासन कार्यक्रमात पालघर जिल्हा पोलीस दलाने अव्वल क्रमांक प्राप्त केला होता. पाटील यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या जनसंवाद अभियानामुळे पालघर जिल्ह्यातील गुन्हेवृत्तींना वेळीच आळा बसला आणि हे अभियान गावागावात राबवले गेले. यासह लोकाभिमुख पोलीस अशी प्रतिमा पालघर पोलीस दलाची झाली. बाळासाहेब पाटील कार्यरत असताना त्यांनी गुन्हे उकल करण्यात अव्वल स्थानावर कामगिरी बजावली. त्यांच्या नेतृत्वाखालील विविध पथकाने शासकीय सेवेसह सामाजिक, शैक्षणिक कामात चांगले योगदान दिले आहे.
अलीकडेच पालघर पोलिसांनी सायबर गुन्हेमुक्त पालघर मोहीम राबवून सायबर विषयक जनजागृतीचे अभियान सुरू केले आहे. पालघर जिल्ह्याच्या कार्यकाळात बाळासाहेब पाटील यांनी जनमानसात पोलिसांची चांगली प्रतिमा तयार करुन पोलीस आणि जनता यांच्यात सुसंवाद घडवून आणला. रस्ते अपघात कमी करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न विशेष होते. पोलीस ठाण्यांची सुसूत्रता, जनतेतील थेट संवाद, गुन्हे प्रवृत्तीला आळा घालणे, कार्यालयीन प्रणाली अद्यावत करणे, पोलीस दलाचे संकेतस्थळ वरून तक्रारी आणि त्याचे निवारण करणे, पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन, पोलीस ठाण्याचे दर्जा उंचावण्याचे प्रयत्न करणे अशा अनेक कामांची संकल्पना बाळासाहेब पाटील यांची आहे. यामुळे पालघर पोलीस दलाला महाराष्ट्र राज्यात विशेष स्थान प्राप्त झाले आहे.
जिल्ह्यातील दोन महत्त्वपूर्ण खुनाच्या गुन्ह्यामध्ये उकल केलेल्या प्रकरणांना पोलीस महासंचालकांचे पदकही बाळासाहेब पाटील यांच्या कार्यकाळादरम्यान पालघर पोलिसांना मिळाले आहे. त्यांचे सुपुत्र रुद्राक्ष पाटील हे आंतरराष्ट्रीय नेमबाज असून त्यांनीही अनेक महत्त्वपूर्ण पदके देशासाठी प्राप्त केली आहेत.