दापचरी येथे 558 हेक्टरवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारणार pudhari photo
पालघर

Palghar News: दापचरी येथे 558 हेक्टरवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारणार

वाढवण बंदराजवळ उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पामुळे राज्यातील शेतमाल निर्यातीला मोठी चालना

पुढारी वृत्तसेवा

पालघर: हनिफ शेख

डहाणू तालुक्यातील दापचरी येथे आंतरराष्‍ट्रीय दर्जाचा कृषी बाजार प्रकल्प उभारण्‍यात येणार असून वाढवण बंदरानजीक उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पामुळे शेतमाल निर्यातीला मोठी चालना मिळणार आहे.

महाराष्ट्र हा देशाच्या कृषी विकासाचा कणा आहे. आज भारताची अर्थव्यवस्था सुमारे चार ट्रिलियन डॉलर च्या उंबरठ्यावर पोचली आहे. आणि विकसित भारताच्या ध्येयाकडे पाऊल टाकत आहे. या प्रवासात सर्वात जास्त योगदान देणाऱ्या राज्यांपैकी एक महाराष्ट्र राज्य आहे विकसित महाराष्ट्र २०४७ या संकल्पने अंतर्गत राज्याने उद्योग आणि कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचे महत्त्वकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले आहे.

सन २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलर, २०३५ पर्यंत दोन ट्रिलियन डॉलर आणि २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष निश्चित करण्यात आले आहे. हे लक्ष गाठण्यासाठी कृषी क्षेत्राला नवीन दिशा देणे अतिशय आवश्यक आहे. महाराष्ट्रातील विविध पिके, अन्नधान्य अशा वैविध्यपूर्ण कृषी संपदेन महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य कृषी कृषी राज्याचा मान मिळवून दिला आहे. मात्र शेतात मात्र शेतातून निघालेला प्रत्येक माल बाजारपेठेपर्यंत पोचेपर्यंत मोठे नुकसान सहन करावे लागते.

काढणी पश्चात होणार नुकसान अपुरी साठवणूक मूल्यवर्धन सुविधांचा अभाव आणि जागतिक बाजारपेठेशी मर्यादित जोडणी. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होत अस­­ल्याचे एकूणच चित्र दिसून येते. एका आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी काढणी पश्चात सुमारे 90 हजार कोटी ते एक लाख कोटी रुपये हे नुकसान होते महाराष्ट्रात हे नुकसान अंदाजे 8000 कोटी ते 12000 कोटी इतके आहे. फळ भाजीपाला अन्नधान्य आणि इतर पिकांमध्ये किमान 20 टक्क्यांपर्यंत काढणीपश्चात नुकसान होत असल्याचे चित्र आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती राष्ट्रीय महत्त्वाचे बाजार आणि आंतरराष्ट्रीय कृषी बाजार अशी आधुनिक त्रिस्तरीय रचना उभारली जात आहे. याच दूरदृष्टीतून पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील दापचरी येथे 558.43 हेक्टर (1,395 एकर) क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारण्यात येणार असून, हा प्रकल्प महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेशी थेट जोडणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम ठरेल, असा विश्वास राज्य सरकारने नुकताच व्यक्त केला.

वाढवण बंदरापासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर उभारणारा प्रकल्प फ्रान्समधील रुंगीस मार्केट, नेदरलँड्समधील रॉयल फ्लोरा हॉलंड तसेच रॉटरडॅम बंदर परिसरातील आधुनिक कृषी लॉजिस्टिक व्यवस्थेच्या धर्तीवर विकसित करणार आहे. जागतिक दर्जाचे कृषी व्यापार केंद्र म्हणून त्याची उभारणी केली जाईल. यामुळे वाढवण बंदर,बुलेट ट्रेन मुरबे पोर्ट याशिवाय प्रस्तावित विमानतळ आणि याच पार्श्वभूमीवर आता हे होणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बाजार केंद्र यामुळे पालघरमध्ये होणारी चौथी मुंबई ही विकासाच्या मोठ्या प्रकल्पांबरोबरच शेती ते थेट आंतरराष्ट्रीय कृषी बाजार यांच्यामधील सेतू असणार आहे.

जागतिक बाजारपेठेशी थेट जोडणी

वाढवण डीपवॉटर पोर्ट, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जवाहरलाल नेहरू बंदर, समृद्धी महामार्ग, वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर आणि वडोदरा एक्सप्रेस वे यांसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांशी जोडणीमुळे निर्यात सुलभ होऊन लॉजिस्टिक खर्चात बचत होणार आहे. फळे, भाजीपाला, फुले, धान्य, कडधान्ये, मसाले आणि प्रक्रिया केलेल्या कृषी उत्पादनांच्या निर्यातीला या प्रकल्पातून मोठी चालना मिळेल. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या पुढाकाराने आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली विकसित होणारा हा प्रकल्प महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य कृषी निर्यात केंद्र बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा ठरेल, असे सांगून दापचरी येथील आंतरराष्ट्रीय कृषी बाजार हा केवळ बाजार नसून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेशी जोडणारा विकासाचा नवा मार्ग असेल हे नक्की.

महाराष्ट्राच्या निर्यात क्षमतेला बळ

महाराष्ट्र द्राक्ष, डाळिंब, कापूस आणि कडधान्य उत्पादनात देशात प्रथम क्रमांकावर असून फळे व भाजीपाला उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशाच्या एकूण कृषी निर्यातीपैकी सुमारे 15 टक्के निर्यात महाराष्ट्रातून होत असून, भारतातील 43 टक्के फळ निर्यातही राज्यातून केली जाते. दापचरी प्रकल्पामुळे या निर्यात क्षमतेत आणखी वाढ होण्याची अपेक्षा पणन मंत्र्यांनी व्यक्त केली.

निर्यात व रोजगारवाढीस चालना

या प्रकल्पामुळे काढणीनंतर होणाऱ्या नुकसानीत 15 ते 20 टक्क्यांनी घट होण्यास मदत होणार असून, शेतमाल वाहतूक व हाताळणी खर्चातही 15 ते 20 टक्क्यांची बचत अपेक्षित आहे. प्रकल्पामुळे 10 हजारांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार असून, शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसह कृषी प्रक्रिया उद्योग आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी गती मिळणार असल्याचे मंत्री रावल यांनी सांगितले.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये :

  • उद्देश: राज्यातील शेतकऱ्यांना थेट जागतिक बाजारपेठेशी जोडणे आणि कृषी निर्यात वाढवणे

  • सुविधा: कोल्ड स्टोरेज, वेअरहाऊस, रेल्वे साईडिंग, ई-ऑक्शन आणि निर्यात सुविधा

  • लोकेशनचा फायदा: वाढवण बंदरापासून केवळ 40 KM अंतरावर. जल, रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीसाठी सुयोग्य जागा

  • तुलना: फ्रान्समधील 500 एकरच्या Rungis आणि चीनमधील 800 एकरच्या बाजारापेक्षा मोठा प्रकल्प

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT