Illegal Road in Forest Pudhari
पालघर

Illegal Road in Forest: अहमदाबाद महामार्गालगतच्या राखीव वन क्षेत्राचा व्यावसायिक वापर सुरुच

वनगुन्हा दाखल झाल्यानंतरही वन विभागाचे कारवाईकडे दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

मनोर: पालघर तालुक्यातील दहिसर तर्फे मनोर वन परीक्षेत्रातील कुडे वनपरिमंडळ अंतर्गत मुंबई अहमदाबाद महामार्गा लगतच्या राखीव वनक्षेत्रातून बेकायदेशीरपणे रस्ता तयार केल्या प्रकरणी वनगुन्हा दाखल झाल्यानंतरही वनविभागाच्या जागेचा व्यावसायिक वापर सुरुच आहे.कारवाई केली जात नसल्याने वनविभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे.

वनहक्क कायद्याअंतर्गत वाटप झालेले आणि संरक्षित वनाचा भाग (सर्व्हे क्रमांक ८४) असलेल्या भूखंडातून अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी डेब्रिज टाकून रस्ता तयार करण्यात आला आहे.

रस्ता तयार करून अवजड वाहनांची वर्दळ वाढल्याने वन संपत्तीचे नुकसान केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. नियमांचे उल्लंघन केले जात असल्यामुळे कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

पालघर तालुक्याच्या कुडे गावाच्या हद्दीत मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत तसेच एका महिलेच्या जागेत विनापरवाना शेड उभारण्यात आला आहे. या शेडमध्ये अवजड वाहने नेण्यासाठी वनविभागाच्या भूखंडातून बेकायदेशीर पणे रस्ता तयार करण्यात आला आहे.

रस्ता तयार करण्यासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून डेब्रिजचा वापर करण्यात आला आहे. वनसंज्ञा लागू असलेल्या क्षेत्रात कोणतीही परवानगी न घेता रस्ता तयार करण्याच्या कामामुळे वनजमिनीचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच शेडमधील यंत्रणेसाठी वीजपुरवठा करण्याच्या उद्देशाने लोखंडी खांब उभारले जात आहेत.

दरम्यान,वन विभागाचे वनपाल आणि वनरक्षकांकडून वनविभागाच्या जागेत सुरु असलेल्या कामावर अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी नागरिकांनी केला आहे.

दोन आठवड्यांपूर्वी वनविभागाच्या भूखंडा मध्ये रस्ता तयार करण्याचे काम करणारा जेसीबी मशीन आणि अन्य वाहने वनविभागाच्या कर्मचऱ्यांकडून कारवाई न करता सोडून देण्याचा आरोप करण्यात आला आहे. वनविभागाकडून कारवाई होत नसल्याने अनधिकृत काम करणाऱ्यांचे मनोबल वाढत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी नागरिकांनी केला आहे.

महामार्गा लगतच्या कुडे गावातील सर्व्हे क्रमांक ८४ मधील वनविभागाच्या भूखंडा मध्ये सुरु अनधिकृतपणे रस्ता तयार केल्या प्रकरणी वनगुन्हा दाखल करण्यात आल्यानंतरही वन विभागाच्या जागेचा व्यवसायीक वापर सुरू असल्यामुळे वन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

वन क्षेत्राचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेकडून या प्रकरणात कोणती भूमिका घेतली जाते, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रतिक्रिया मिळवण्यासाठी वनविभागाचे वनक्षेत्रपाल, वनपाल आणि वनरक्षकांना संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT