Palghar News Pudhari
पालघर

Palghar News: पालघरमध्‍ये खरच गुटखा, मटका बंदी झाली आहे का? मोठ्या प्रमाणावर गुटखा जिल्ह्यात कुठून येतो?

चौकाचौकात मटका चालतो कसा?

पुढारी वृत्तसेवा

पालघर: महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर अनेक वर्षांपासून बंदी असतानाही पालघर जिल्ह्यात गुटखा आणि मटका व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाया केल्या जात असल्या तरी या अवैध व्यवसायांवर कायमस्वरूपी लगाम लावण्यात यंत्रणांना अपयश येत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

मुळात पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील गुटखा आणि मटका या दोन्ही अवैध धंद्यावर करडी नजर ठेवत याचे रॅकेट एक प्रकारे उद्ध्वस्त केले होते. मात्र त्यानंतर स्थानिक पातळीवरील अभयामुळे गुटखा विक्री आणि मटक्याचे व्यवसाय पुन्हा राजरोसपणे सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

आज जवळच्या गुजरात सीमेवरून महाराष्ट्रात शिरणाऱ्या अवैध गुटखा वाहतुकीच्या वाहनांवर कारवाई झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र या कारवाया जुजबी ठरत असल्याचे दिसून येत आहे. कारण आज जिल्ह्यातील कोणत्याही टपरीवर दुकानात अगदी सहजरीत्या गुटखा मिळतो याशिवाय याची विक्री कुठे होते कोण करतो गुटखा कुठून याबाबत स्थानिक पोलिसांना याची माहिती कशी पडतं नाही हा संशोधनाचा विषय आहे.

गुटखा बरोबरच अनेक सुखी संसाराची वाट लावणारा मटका जुगार देखील जिल्ह्यात फोफावत चालला असून मटका धंदा करणारे यासाठी कोणतेही दुकान थाटत नाही फक्त एखाद्या पडक्या,तूटक्या भिंती किंवा काही टपऱ्यांचा आधार घेऊन त्यात चालते बोलते नोंदणी करून हा धंदा चालवला जातो.

सध्या कागदाच्या चिठ्ठीवर लाखो रुपयांची उलाढाल या व्यवसायातून होत असताना याला देखील स्थानिक पोलिसांचे अभय मिळाल्याशिवाय हे अवैध धंदे होऊच शकत नाही या शिवाय जुगाराचे अड्डे देखील जोमात चालू असून जिल्ह्यात मटका आणि गुटखा बंदी आता फक्त कागदावर राहिल्याचे एकूण चित्र आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत अनेक ठिकाणी गुटखा सहज उपलब्ध होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. विशेषतः शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणांच्या परिसरातही गुटख्याची विक्री होत असल्याने युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे, मटका व्यवसायावर बंदी असतानाही काही ठिकाणी तो राजरोसपणे सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. स्थानिक पातळीवर छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या या जुगार व्यवसायामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

मात्र पालघर जिल्ह्यात प्रत्यक्षात गुटखा आणि मटका व्यवसाय कितपत बंद झाले आहेत, याचा आढावा घेतल्यास बंदी फक्त कागदोपत्रीच असल्याचे चित्र दिसत असल्याचा आरोप होत आहे. संबंधित विभागांनी नियमित आणि प्रभावी कारवाई करून या अवैध व्यवसायांचे संपूर्ण उच्चाटन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

"गुटखा आणि मटका मुक्त पालघर" ही घोषणा केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. कारण पोलिस अधीक्षक याविषयावर गंभीर असताना स्थानिक प्रशासनाकडून अधीक्षकांच्या उदात्त हेतुला मुठमाती देण्याचे काम होत आहे.

पोलिसांनी ठरवले तर

मुळात आज गुजरात हद्दीवर किंवा जिल्ह्यात अनेक गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनांना पोलिसांनी पकडल्याच्या घटना घडत आहेत मात्र जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गुटखा माफिया तयार झाले असून त्यांचे अर्थपूर्ण संबंध स्थानिक पोलिसांशी असल्याने हा धंदा तेजीत आला आहे. कारण प्रत्यक्षदर्शी दिसणाऱ्या या कारवाया नंतर अनेकदा तोडपाणी देखील होते.

याशिवाय होलसेल भावात हा गुटखा कोण विकतो कुठून आणतो याची माहिती देखील असते मात्र जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे कारण पोलिसांनी ठरवले तर कही दिवसांत जिल्हा खऱ्या अर्थाने गुटखा आणि मटका मुक्त होवू शकतो हे नक्की.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT