खानिवडे : वाहनधारकांना येत्या ३१ मार्च पूर्वी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवणे हे भारतातील सर्व वाहनांसाठी अनिवार्य करण्यात आले होते. यासाठी वाहन धारकांची मोठी धावपळ सुरू झाली होती. मात्र आता आता केवळ १० दिवसांचा अवधी उरला असतानाही नंबर प्लेट बसविण्याचे काम खूप कमी प्रमाणात झाले आहे. त्यात जर दिलेल्या मुदतीत ह्या नंबर प्लेट बसवता आल्या नाहीत तर प्रत्येक वेळेला एक हजारांचा दंड आकारण्यात येणार असल्याने वाहन धारकांमध्ये चलबिचल वाढली होती.
मात्र परिवहन विभागाने येत्या ३० जून पर्यंत उच्च सुरक्षा नोंदणीला मुदत वाढ दिल्याने वाहन धारकांना दिलासा मिळाला आहे. पण पुढील दिलेल्या मुदतीत जर ह्या नंबर प्लेट बसवल्या गेल्या नाहीत तर मुदती पुढील काळात रस्त्यावर जेव्हा जेव्हा उच्च सुरक्षा नंबर पाट्या न लावणारी वाहने आढळली तर त्यांना प्रत्येक वेळी एक हजारांचा दंड आकारण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आहे.
१.४.२०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी दि. ३१ मार्च पर्यंत बसविण्याचे निर्देश देण्यात आले होते. एचएसआरपी ही एक विशेष प्रकारची नोंदणी प्लेट आहे. जी अल्युमिनियमची बनलेली असते आणि तिच्यावर एक विशिष्ट क्रमांक कोड असतो. ही प्लेट वाहनाच्या सुरक्षिततेसाठी आणि चोरी रोखण्यासाठी महत्त्वाची आहे. त्यासाठी दिलेल्या मुदतीत वाहनांना एच एस आर पी प्लेट बसविण्याचे आवाहन वसई परिवहन विभागाने वाहन चालक व मालक यांना केले आहे.