पालघर

महामार्गावर कंटेनरची जलवाहिनीला धडक; लाखो लिटर पाणी वाया

Palghar News | वसई-विरारवर जलसंकटाचे सावट

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे : ऐन उन्हाळ्यात वसई-विरारकरांना पाण्याची अधिक आवश्यकता असतानाच महामार्गावर घडलेल्या अपघातामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. मुंबई–दिल्ली महामार्गावरील शिरसाड-भामटपाडा परिसरात शुक्रवारी पहाटे चार ते साडेचारच्या सुमारास असंतुलित ट्रक कंटेनरने सुर्या प्रकल्पाच्या जलवाहिनीवरील दाब कुंडीला (प्रेशर व्हॉल्व्हला) जोरदार धडक दिल्याने जलवाहिनी फोडूनपलीकडे ट्रक एका झाडाच्या खोडाला धडक देत स्थिरावला.

मात्र या धडकेनंतर प्रचंड दाबाने पाण्याचा फवारा उसळला आणि मोठ्या प्रमाणात पाणी महामार्गावर वाहू लागले. या घटनेनंतर जलप्रवाह खंडित केल्यानंतरही सकाळी आठ वाजेपर्यंत पाणी वाहत राहिल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली.

वसई-विरार महानगर प्रदेशाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या मुंबई–दिल्ली महामार्गालगत टाकण्यात आल्या आहेत. याच मार्गावरील सुर्या प्रकल्पाच्या जलवाहिनीवरील दाब कुंडीला गुजरातकडे जाणाऱ्या कंटेनरने धडक दिली. शिरसाड उड्डाणपुलाच्या उतारावर ट्रकचे स्टेअरिंग निकामी झाल्याने वाहनावरील ताबा सुटून हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम सुरू केले. मात्र जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत वसई-विरार परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT