Palghar Rain, pudhari photo
पालघर

Palghar Rain : पालघरमध्ये वरुणराजाची दमदार कृपादृष्टी

सर्व तालुक्यांत पेरणीची लगबग, बळीराजा सुखावला

पुढारी वृत्तसेवा

पालघर : पालघर जिल्ह्यात अखेर मान्सूनची प्रतिक्षा संपली असून मंगळवारपासून वरूणराजाने दमदार हजेरी लावली आहे. संततधार पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. डहाणू, तलासरी, पालघर, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा आणि वसई या सर्व तालुक्यांत समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी मोठ्या उत्साहाने शेतात उतरले असून, पेरणीची लगबग सुरू झाली आहे.

पहाटेपासून सुरू असलेल्या रिमझिम ते मुसळधार सरींनी शेतजमिनींना पुरेसा ओलावा मिळाला आहे. भातखाचरांत ट्रॅक्टर, बैलजोड्या आणि शेतकरी कामाला लागले असून, अनेक ठिकाणी महिलाही रोपांची तयारी आणि लागवडीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पावसाच्या प्रतीक्षेत असलेली शेते आता पाण्याने भरून गेल्याने बळीराजाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.यापूर्वी पावसाने दडी मारल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे.

शेतांमध्ये पुरेसे पाणी साचल्याने भातासह खरीप पिकांच्या पेरणीला वेग आला आहे. विशेषतः आदिवासी पट्ट्यातील डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि वाडा तालुक्यांत शेतशिवारात दिवसभर पेरणीची धामधूम दिसून येत आहे. पालघर आणि वसई तालुक्यांतही पावसाने जोर धरल्याने शेतीकामांना चालना मिळाली आहे. संततधार पावसामुळे नद्या, ओढे, तलाव आणि बंधाऱ्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, जमिनीतही चांगला ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांमध्ये आशावाद निर्माण झाला आहे.

हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला असून, हा पाऊस कायम राहिल्यास जिल्ह्यातील खरीप हंगाम भरघोस होईल, असा विश्वास कृषी क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे. संततधार पावसामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असून, जिल्हाभर शेतशिवारात पेरणीची लगबग व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पावसाच्या प्रत्येक सरीसोबत शेतशिवारात नव्या आशा रुजत आहेत आणि बळीराजा नव्या जोमाने खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे, असे चित्र सध्या जिल्हाभर पाहायला मिळत आहे..या पावसामुळे भात, नागली वरईच्या पेरणीला वेग येणार आहे. आता पेरणी कामांसोबतच घरांची डागडुजी अशा कामांना वेग येणार असून बाजारपेठांत देखील गर्दी होण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सर्तक झाला आहे.

ऑरेंज अलर्टची शक्यता

पुढील ४८ तास जिल्ह्यासाठी असाच पाऊस राहिला तर ऑरेंज अलर्ट जारी केला जाऊ शकतो तसेच. डोंगराळ भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. नागरिकांना नदी-नाले, धबधब्याजवळ जाणं टाळण्याचं आवाहन करण्यात येत असून पहिल्या पावसात भूस्खलन दरडी कोसळणे असे प्रकार घडत असल्याने सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तर यापावसामुळे जिल्ह्यातील टेकडीवरून वाहणारे धबधबे पुन्हा जिवंत होण्याची चिन्हे आहेत. कालपर्यंत कोरडे असलेले झरे आता पर्यटकांना साद घालू पाहत आहेत. एकूणच मोठ्या प्रतीक्षेनंतर आलेल्या या पावसाने पालघरकरांना दिलासा दिला आहे. शेतात पेरणीची लगबग सुरू होणार असली तरी, मुसळधार पावसामुळे होणाऱ्या गैरसोयींकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. प्रशासन सतर्क असून आहे, आता नागरिकांनीही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT