पालघर : पालघर जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक तालुके जलमय झाले आहेत. अनेक ठिकाणी पडझडीच्या , झाडे कोसळण्याच्या तर विजेच्या धक्क्याने जनावरे व काही नागरिकही बाधित झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
घराची भिंत अंगावर कोसळून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पालघर नगरपरिषद हद्दीतील आगरी पाडा परिसरात घडली आहे. राबिया शब्बीर सय्यद ( ४७) असे मृत महिलेचे नाव आहे. पालघर नगरपरिषद हद्दीतील आगरीपाडा परिसरात राबिया शब्बीर सय्यद आपल्या कुटुंबासह राहत होत्या. पालघर परिसरात बरसलेल्या मुसळधार पावसामुळे राबिया यांच्या घराच्या आसपास पाणी साचले. त्यामुळे घराच्या आसपास पाणी साचून राहू नये यासाठी साचलेल्या पाण्याचा निचरा राबिया करत होत्या.
घराजवळ पाण्याचा निचरा करत असताना अचानक त्यांच्या अंगावर राहत्या घराची भिंत कोसळली आणि त्या गंभीररित्या जखमी झाल्या. गंभीर जखमी राबिया यांना तातडीने उपचारासाठी पालघर ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तेथे त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे राबिया सय्यद यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तर मोखाड्यातही घराची भिंत कोसळ्याची घटना घडली सुदैवाने यात जीवितहानी टळली.
मुसळधार पावसाचा फटका बेलपाडा गावालाही बसला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे बेलपाडा गावातील रविंद्र काशिनाथ वांगड यांच्या घराची पाठीमागील भिंत पहाटेच्या वेळी अचानक कोसळल्याची घटना घडली.सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी घरातील सदस्य सुरक्षित ठिकाणी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार गेल्या अनेक तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घराच्या भिंतीच्या पायाला पाणी लागल्याने ती कमकुवत झाली होती.
अखेर भिंत अचानक कोसळल्याने घरातील काही घरगुती साहित्याचेही नुकसान झाले.गुरुवारी पहाटेच्या दरम्यान मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले आणि कुटुंबीयांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात मदत केली.घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात आली असून नुकसानग्रस्त घराचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.नुकसानग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे.