वाडा : गोवर्धन इको व्हिलेज नावाने प्रसिद्ध असणाऱ्या इस्कॉन मंदिराकडे जाणाऱ्या मार्गाची अनेक वर्षांपासून दुर्दशा झाली असून मोठ्या प्रयत्नाने या रस्त्याच्या काही टप्प्यात डांबरीकरण मंजूर करण्यात आले आहे. पहिला थर टाकल्या नंतर मात्र हे काम ठप्प झाले असून हजारो भाविकांसह स्थानिकांना या खराब रस्त्याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. गुहीर गावाजवळ असणाऱ्या एका खदान व्यावसायिकाने मात्र उच्छाद घातला असून याच पट्ट्यात सुरू असणाऱ्या अती अवजड वाहनांमुळे रस्त्याचा पार बट्ट्याबोळ झाला आहे.
गालतरे - हमरापूर या जवळपास 7 किमी अंतराची अवस्था अनेक वर्षांपासून दयनीय असून सुरुवातीला काही भागात डांबरीकरण झाले असून पुढे खड्ड्यात रस्ता कुठे हरवला आहे हे शोधण्याची वेळ आली आहे. राज्यात प्रसिद्ध असणारे इस्कॉन मंदिर याच भागात असून दररोज हजारों भाविक या मार्गे मंदिरात येतात. अथक प्रयत्नानंतर अखेर या मार्गावर जवळपास साडेतीन किमी अंतराचे डांबरीकरण हाती घेण्यात आले असून कामाला सुरुवात देखील झाली आहे.
1.120 किमी अंतराचे दोन टप्पे तर 900 मीटर व 270 मीटर असे चार टप्प्यात या मार्गाचे काम होणार आहे. एकंदर साडेतीन किमी अंतरासाठी जवळपास 2.75 कोटींचा निधी मंजूर असून सुरुवातीपासून जाड खडीचा (एमपीएम) थर निकृष्ट असल्याचे वृत्त दैनिक पुढारीने प्रसिद्ध केले असून अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला बाबत सूचना देखील केल्याची माहिती आहे.
जाड खडीचा (एमपीएम) थर टाकून मोठा कालावधी उलटला मात्र डांबरीकरण सुरू होत नसल्याने स्थानिक विचारात पडले असून जाड थर खराब झाल्यावर हे डांबरीकरण होणार आहे का असा सवाल विचारला जात आहे. रस्त्याचे काम सुरू असतानाच गुहीर गावाजवळ असणाऱ्या खदान व्यावसायिकाच्या अती अवजड हायवा ट्रक याच मार्गावरून येजा करीत आहेत. प्रत्यक्षात अधिकृत परवानगीच्या अनेक पट अधिक वाहतूक माल या गाड्यांमधून होत असून यावर कुणाचाही अंकुश नसल्याने नवीन रस्त्याची विल्हेवाट लागणार अशी ग्रामस्थांना भीती आहे.
एकतर आधीच तालुक्यात अनेक भागात खडीकरण करण्याच्या आधी खराब रस्त्याचे खोदकाम करणे गरजेचे होते. मात्र त्याबाबत कंत्राटदाराने थातुरतमातुर काम करत डांबरीकरणाला होणारा विलंब मनस्ताप वाढविणारा दिसत आहे. जिल्हाधिकारी पालघर यांचे यामार्गाकडे खास लक्ष असल्याचे काही अधिकाऱ्यांनी सांगितले होत. मात्र अती अवजड वाहतुकीला त्यांनी आळा घातला नाही तर उत्तम मार्गाचे स्वप्न हे केवळ स्वप्नंच राहील असे स्थानिक सांगतात. पीडब्लूडी अधिकारी दीपक वाघ यांना संपर्क केला असता कंत्राटदाराला तातडीने डांबरीकरण सुरू करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून अवजड वाहतूक रोखणे अन्य विभागाचे काम आहे असे त्यांनी स्पष्ट केले.