गोऱ्हेफाटा-वावेघर-खानिवली मार्गावर धुळीचे संकट  pudhari photo
पालघर

Dust pollution : गोऱ्हेफाटा-वावेघर-खानिवली मार्गावर धुळीचे संकट

बेसुमार खड्ड्यांमुळे रस्ता बनला मृत्यूचा सापळा

पुढारी वृत्तसेवा

वाडा : “रोज मरे त्याला कोण रडे“ या म्हणी प्रमाणे गोऱ्हेफाटा ते खानिवली या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांची व स्थानिकांच्या तक्रारींची अवस्था झाली आहे. जीवघेण्या खड्ड्यात अडकलेला मार्ग, वरून दिवसरात्र सुरू असणारी अती अवजड वाहतूक व यामुळे नाकातोंडात घुसणारी धूळ यामुळे लोकांचा जीव पार मेटाकुटीला आला आहे. प्रशासन मात्र हे सगळे डोळ्यांवर हात घेऊन मुकाट्यात बघत असून लोकप्रतिनिधी तर या भागाला लाभलेले नाहीत असे दुर्दैवी चित्र बघायला मिळत आहे.

गोऱ्हेफाटा ते खानिवली हा मार्ग महामार्गाला उत्तम पर्याय होता मात्र सार्वजनिक बांधकाम व आरटीओ विभागाच्या भोंगळ कारभारामुळे या मार्गाचे तीनतेरा वाजले असून हाच मार्ग वाहनचालकांसाठी कर्दनकाळ बनला आहे. गोऱ्हेफाटा ते वावेघर मार्गे आपटी या भागात इतके खड्डे पडले आहेत की यातून वाट काढायची कशी असा प्रश्न वाहनचालकांना पडतो.

तोंडाचा रंग बदलून टाकणारी धूळ वाहनचालकांच नव्हे तर शेजारी राहणाऱ्या लोकाच्या पार घरात घुसून धुमाकूळ घालीत आहे. दुचाकीस्वार तर मेकअप करून निघतो अशी भीषण अवस्था असून कमी दृश्यमानतेमुळे अपघाताचा धोका डोक्यावर टांगलेला असतो.

गौणखनिज उत्खननात हा भाग अग्रेसर असून शेकडो हायवा गाड्या रोज या मार्गावरून येजा करतात. वाहनांच्या क्षमतेनुसार अधिकृत परवाना जास्तीतजास्त 20 टन क्षमतेचा असताना प्रत्यक्षात येथून 60 ते 65 टनांच्या गाड्या जातात हे धक्कादायक वास्तव असल्याचे स्थानिक सांगतात. इतकी अवजड वाहने गेल्यावर कोणताही रस्ता तग धरू शकत नाही हे उघड असून आधीच खराब रस्त्याची काय अवस्था झाली असेल हे यावरून स्पष्ट होत आहे.

अती अवजड वाहनांमुळे रस्त्याचा बट्ट्याबोळ झाल्याची अनेक उदाहरणे व तक्रारी असतानाही प्रशासन ढिम्म का आहे असा लोकांचा सवाल असून आमच्या नशिबात रस्त्याचे सुख येईल कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT