वाड्यातील गोर्‍हेफाटा ते खानिवली मार्गाची दुर्दशा  pudhari photo
पालघर

Palghar News : वाड्यातील गोर्‍हेफाटा ते खानिवली मार्गाची दुर्दशा

कुचकामी दुरुस्ती पुन्हा खड्ड्यात गेल्याने संताप

पुढारी वृत्तसेवा

वाडा : गुळगुळीत व उत्तम रस्ते त्या भागाला विकसनशील बनवितात मात्र वाडा तालुक्यातील रस्त्याची झालेली दुर्दशा तालुक्याला भकास बनवित आहे असे लोकांचे म्हणणे आहे.गोर्‍हेफाटा ते खानिवली या मार्गाची अवस्था इतकी भयंकर आहे की त्यावरून प्रवास करणे अवघड व अतिशय घातक बनले आहे. नुकताच या मार्गाची दुरुस्ती करण्यात आली मात्र दुरुस्ती पूर्ण होताच रस्त्याची अवस्था अजूनही खराब झाल्याचे पाहायला मिळत आहे. अतिशय महत्वाच्या मार्गाची झालेली दुर्दशा वाहनचालकांना बेजार करीत असून येजा करणार्‍या स्थानिकांच्या सहनशीलतेचे कौतुक करावे असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

महामार्गाला पर्याय असणार्‍या गोर्‍हेफाटा ते खानिवली या मार्गाची स्थिती सध्या इतकी भयंकर आहे की यावर प्रवास करणे म्हणजे साक्षात नरकाच्या वाटेवरून चालण्यासारखे आहे. गोर्‍हेफाटा, वावेघर, मुंगुस्ते, देवळी, आपटी या ठिकाणी तर खड्ड्यात दुचाकी पूर्ण गायब व्हावी इतके मोठे खड्डे पडले असून वाहने हाकायची कशी असा विचार क्षणभर उभे राहून वाहनचालकांना करावा लागतो. कारखाने व क्रेशर मशीनचा या भागात भडिमार असून अती अवजड वाहनांची रेलचेल थांबायला तयार नाही. नुकताच एका कंत्राटदाराने खड्डे भरले मात्र कावळ्याच्या शेणाच्या घराप्रमाणे जणू ही दुरुस्ती वाहून गेल्याचे स्थानिक सांगतात.

राज्यात विकास जोमाने सुरू आहे अशा सरकारच्या घोषणा म्हणजे निव्वळ वल्गना आहेत हे पहायचे असल्यास वाडा तालुक्यातील कोणत्याही रस्त्यावरून प्रवास केल्यावर आपल्या लक्षात येईल. रस्त्यांची दुर्दशा झाली असताना याला जबाबदार असणारी अवजड वाहतूक मात्र तालुक्यात फोफावत असल्याने संताप व्यक्त केला जात असून सार्वजनिक बांधकाम विभाग नेमके करते तरी काय असा सवाल जनतेने विचारला आहे. महामार्गासह प्रत्येक रस्त्याला लागलेले खराब रस्त्यांचे हे शुक्लकाष्ठ संपणारा कधी असा सवाल विचारला जात आहे. बांधकाम विभागाच्या मंत्र्यांनी आता वाड्यातील या समस्येची दखल घ्यायला हवी अशी मागणी केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT