Gokhivare Waste Scam Pudhari
पालघर

Gokhivare Waste Scam: गोखिवरे कचरा घोटाळ्याचा महासभेत स्फोट! संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे महापौरांचे आदेश

लवकरच अनेक गोष्टी उघड होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

वसई: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या वर्तुळात सध्या एका मोठ्या घोटाळ्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. नुकतेच पार पडलेल्या विशेष महासभेत अखेर या बॉम्बचा स्फोट झाला. गोखिवरे क्षेपणभूमीवरील कचऱ्यातून खत निर्मितीचे स्वप्न दाखवणाऱ्या बायो-मायनिंग प्रकल्पाने प्रत्यक्षात मात्र पालिकेच्या तिजोरीला कोट्यवधी रुपयांचा चुना लावल्याचे भयंकर वास्तव समोर आले आहे.

वरवर पाहता या महासभेचा उद्देश केवळ मे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट या नवीन सल्लागार कंपनीची नियुक्ती करणे हा होता. पण, विषयाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी पुराव्यांसहित जे गंभीर आरोप केले, त्याने संपूर्ण सभागृह हादरून गेले.

कचऱ्यावर कोणतीही प्रत्यक्ष प्रक्रिया न करताच, नामांकित कंपन्यांना माल पुरवल्याची बनावट कागदपत्रे उभी करून ठेकेदाराने कोट्यवधी रुपयांची बिले लाटली असल्याचा खळबळजनक दावा पाटील यांनी केला. सर्वात धक्कादायक म्हणजे, या महाघोटाळ्याला पालिकेतीलच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मूक संमती दिल्याचे त्यांनी सभागृहात पुराव्यांनिशी मांडले.

या अनपेक्षित हल्ल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. स्वतःची बाजू सावरताना महापालिका उपायुक्त अर्चना दिवे यांनी जुन्या सल्लागार कंपनीवर, म्हणजेच टंडन अर्बन सोल्यूशनवर खापर फोडण्याचा प्रयत्न केला.

टंडन कंपनी कामावर नियंत्रण ठेवण्यात आणि कर्तव्य पार पाडण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याने त्यांना हटवून नवीन सल्लागाराची नियुक्ती करत असल्याची सारवासारव त्यांनी केली. पण मनोज पाटील यांनी या उत्तराच्या चिंधड्या उडवल्या.

बोगस कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधींच्या फाईल्स जेव्हा टेबलावर आल्या, तेव्हा त्यांची साधी सत्यताही का पडताळली गेली नाही, आणि चौकशी न करता मोठ्या रकमेच्या बिलांना मंजुरी कशी मिळाली, असे थेट आणि अस्वस्थ करणारे सवाल त्यांनी प्रशासनाला विचारले.काही सत्ताधारी नगरसेवकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाटील यांनी दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी लावून धरली.

संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

प्रकरणाचे गांभीर्य आणि मांडण्यात आलेल्या पुराव्यांची सखोलता पाहता महापौर अजीव पाटील यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली. त्यांनी तात्काळ प्रशासनाला या घोटाळ्यात सामील असलेल्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे कठोर आदेश दिले आहेत.

महापौरांच्या या थेट आदेशामुळे पालिकेतील भ्रष्ट साखळीचे धाबे दणाणले असून आता पोलिसांच्या चौकशीत कोण कोण अडकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी आणि या घोटाळ्याचा खरा सूत्रधार कोण हे जगासमोर आणण्यासाठी विरोधी पक्षनेते मनोज पाटील लवकरच एक जाहीर पत्रकार परिषद घेणार आहेत. याचा सविस्तर आणि धक्कादायक पर्दाफाश होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT