पालघर : लोकसेवक हा जनसेवेसाठी नेमलेला अधिकारी आहे. त्यांनी त्यांचे चोख कर्तव्य बजावणे आवश्यक आहे. लोकसेवेत कसूर व ज्यांना सरकारी चौकटीत राहून जुळवून घेता येत नसेल, त्यांनी जिल्ह्याबाहेर बदली करून घ्यावी असा सज्जड दम पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबारात दिला.
नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हा जनता दरबार आयोजित केला असून जनतेच्या मेहेरबानीसाठी नाही. त्यामुळे जनसेवेला प्राधान्य द्या, असा सल्ला पालकमंत्री नाईक यांनी उपस्थित प्रशासकीय अधिकारी वर्गाला दिला, पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या जनता दरबारात जिल्हाभरातून समस्यांचा महापूर दिसून आला.
या जनता दरबारात विविध विभागांशी विविध समस्या असलेले तब्बल ७४१ निवेदन अर्ज पालकमंत्री यांच्याकडे आले. यातील ३६ अर्ज जागीच निकाली काढण्यात आले. उर्वरित अर्ज विभागाकडे पाठवून येत्या काही दिवसात त्याचा निपटारा केला जाईल असे गणेश नाईक यांनी सांगितले. नागरिकांच्या अडचणी असतील, तर कायद्याच्या चौकटीत राहून त्यातून मार्ग काढा. नागरिकांच्या समस्या आल्या आहेत, त्या सोडवा. त्याचा परिणाम समोर आला पाहिजे, असे आदेश पालकमंत्र्यांनी दिल्या.
पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी घोषणा अलीकडे झाली. हा जिल्हा पूर्वी ठाणे जिल्हा असल्यामुळे या जिल्ह्याची सर्वस्वी जाण मला आहे. कमी गुन्हेगारी असलेला हा जिल्हा असून या जिल्ह्याची झपाट्याने सुधारणा होत आहे, असे पालकमंत्री यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जनता, प्रशासन, पत्रकार जागृत आहेत. अधिकारी वर्गाने जनतेच्या समस्येवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
आपल्यातील कमतरता जाणून घ्यावी व नागरिकांची कामे करण्यात कमी पडत असल्यास बदली करून घ्यावी असे पालकमंत्री यांनी सांगितले. अनेक निवेदने आल्यानंतर सरकारी यंत्रणा या शासकीय नियमाला धरून चालत नसल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र हे कार्यक्रम खपवून घेतले जाणार नाही. राजशिष्टाचारानुसार दिलेल्या आदेशाचे पालन करून ते पाळावेत असे आदेशही पालकमंत्री नाईक यांनी यावेळी दिले. आता जिल्ह्याचा जनता दरबार घेतला आहे. मात्र यापुढे जाऊन तालुक्यानीहाय जनता दरबार घेण्यात येणार आहे. तर बसाई तालुक्यात मतदार संघ निहाय जनता दरबार घेऊन जनतेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नाईक यांनी म्हटले. महायुतीच्या मंत्र्यांनीही जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन शासकीय यंत्रणांच्या व जनसेवेच्या कामाचा आढावा घेतला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
केळवे व सफाळे दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीजचे मोठे टेक्सटाईल पार्क उभे राहत आहे. हे होत असताना स्थानिकांना नोकन्या व तेथील नागरिकांचे जीवनमान उंचावले पाहिजे या दृष्टिकोनातून विकास अपेक्षित आहे असे पालकमंत्र्यांनी सांगितले. वाढवण बंदर उभारत असताना तेथील स्थानिकांचे अस्तित्व टिकून राहणे गरजेचे आहे. मी स्वतः एमआयडीसी व सिडको यामध्ये जमीन गेलेला प्रकल्प बाधित व पीडित आहे. त्यामुळे प्रकल्प बाधित म्हणून काय त्रास होतो हे मला माहित आहे. विकास होत असताना किंवा प्रकल्प येत असताना होणाऱ्या बदलाची आधी कल्पना द्या व त्यानंतर पुढील कार्यवाही करा.
सकाळपासून प्रशासनातील विविध विभागाच्या टेबलवर टोकनसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. प्रशासनाकडून नागरिकांच्या या समस्या सोडवल्या गेल्या नसल्याने मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याची चर्चा सभागृहात होती. जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागाचे टेबल व खात्याचे प्रमुख अधिकारी दरबारात उपस्थित होते. संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय खचोखच भरून गेले होते. नागरिकांचे अर्ज आल्यानंतर संबंधित विभागामार्फत टोकन देऊन जनता दरबार असलेल्या नियोजन सभागृहात क्रमांकानुसार अर्ज पालकमंत्र्यांकडे सादर होत होते व संबंधित विभागाच्या अधिकारी वर्गाला बोलवून त्याविषयी विचारणा केली जात होती.