पालघर : नविद शेख
नशिबाने प्रत्येकाला लॉटरी लागत नाही; परंतु एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली आणि ते मुख्यमंत्री झाले, याचा आनंद आहे, असे सांगत कमावलेले टिकवता आले पाहिजे, असा सल्ला गणेश नाईक यांनी दिला. तसेच किती कमावलं, कसं कमवलं पण कसं टिकवलं याकडे जनसामान्यांची नजर असते, असे प्रतिपादन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले. शुक्रवारी सकाळी पालघर तालुक्यातील महामार्गालगतच्या दुर्वेस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गणेश नाईक यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी पालघर जिल्ह्यात टिशू कल्चर लॅब उभारण्याची घोषणा केली, पालघर जिल्ह्यात दोन कोटी झाडांची लागवड केली जाणार असल्याचे सांगत येत्या पाच वर्षात राज्य भरात अडीचशे कोटी रोपं लागणार आहेत, असे सांगत जलद गतीने रोप निर्मितीसाठी राज्यात पाच टिशू कल्चर लॅबची उभारणी केली जाणार असल्याची माहिती दिली. टिशू लॅबसाठी प्रत्येकी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली.
कोकण विभागातील टिशू लॅब उभारण्यासाठी कोकणातील जिल्हा ठरला नसला तरीही टिशू कल्चर लॅब उभारण्याची पालघर जिल्ह्याला संधी दिली जाणार असल्याची घोषणा पालकमंत्री गणेश नाईक यांनी यावेळी केली. तसेच लॅब उभारणीसाठी आदेश निर्गमित केल्याची माहिती दिली. शुक्रवारी सकाळी वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र दुर्वेश येथील मुख्य इमारत व कर्मचारी निवासस्थानाच्या बांधकामाचे भूमिपूजन संपन्न झाले.
यावेळी खा. डॉ. हेमंत सवरा, आ. राजेंद्र गावित, आ. विलास तरे, जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, दुर्वेश सरपंच आकाश कडवमाजी जि. प. सदस्या विनया पाटील, आरोग्य अधिकारी संतोष चौधरी, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, तालुका आरोग्य अधिकारी तन्वीर शेख शिवसेनेचे वसंत चव्हाण, समाजसेवक दामोदर पाटील तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील कोणतेही विकासकाम थांबणार नाही
पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की, पालघर जिल्ह्याची निर्मिती केवळ कागदोपत्री नव्हे तर प्रत्यक्षात झाली पाहिजे यासाठी माझा आग्रह होता. जिल्हा मुख्यालयाच्या देखण्या इमारती उभारलेल्या आहेत, शिक्षण, आरोग्य व इतर सेवांमध्ये गतीने विकसित होत आहेत. पालघर जिल्ह्यातील डोंगर हिरवेगार करणे, रस्त्यांच्या कडेला विविध रंगांची व सुगंधी झाडे लावणे आणि २०० हेक्टर फॉरेस्ट जमीन सौंदर्गीकरणासाठी वापरण्याचे नियोजन असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले. तसेच जिल्ह्यातील कोणतेही विकासकाम निधीअभावी थांबणार नाही, असे आश्वासन पालकमंत्री यांनी दिले.