पालघर : पालघर ठाण्याशी जवळचा संबंध असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे आजच त्यांनी पालघर जिल्ह्यातील स्वामित्व योजनेच्या कार्यक्रमात पालघरचे पालकमंत्री होण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानंतर राज्य शासनाने शासन निर्णय काढून राज्यातील पालकमंत्र्यांची घोषणा केली. त्यामध्ये नाईक यांना पालघरच्या पालकमंत्र्यांची धुरा देण्यात आली आहे.
ठाणे जिल्हा असताना गणेश नाईक यांनी तीन वेळा पालकमंत्री पद भूषवलेले आहे. 2014 मध्ये पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्यापासून वेगळा झाला. त्यानंतर भाजपमार्फत विष्णु सवरा व रवींद्र चव्हाण यांनी पालकमंत्री पदाची धुरा सांभाळली. अलीकडच्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला राज्यात कौल मिळाला व महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर पालघरचे पालकमंत्री कोण अशा अनेक उलट सुलट चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. मंत्री गणेश नाईक यांचे नाव पालकमंत्री पदासाठी पुढे येऊ लागले व नाईक हे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री होतील, अशा खात्रीलायक चर्चा संपूर्ण जिल्ह्यात चर्चेला होत्या.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात स्वामित्व योजनेअंतर्गत गावठाण जमिनीवरील घराच्या मालमत्ता पत्रकांचे वितरण गणेश नाईक यांच्या हस्ते पालघर मध्ये करण्यात आले. यावेळी पालघर च पालकमंत्री झालो तर आनंदच आहे, असे नाईक यांनी म्हटले होते व पालकमंत्री बाबतचा योग्य तो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असेही त्यांनी पत्रकारांच्या चर्चेदरम्यान म्हटले होते. अखेर वनमंत्री गणेश नाईक यांची पालघरच्या पालकमंत्री पदी वर्णी लागली असून राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत आज निघालेल्या शासन निर्णयात नाईक हे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील असा उल्लेख करण्यात आल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये जल्लोष आहे.