वाडा : मच्छिंद्र आगिवले
कोकणात गणेशोत्सव हा सण सर्वात मोठा व महत्त्वाचा मानला जात असून गणेश मूर्ती हे या उत्सवातील प्रमुख आकर्षण असते. वाडा शहरात मात्र यावर्षी गणेशमूर्तींचे दर काही विक्रेत्यांकडे गगनाला भिडले असून सामान्य भाविकांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. दोन ते अडीच फुटांच्या घरगुती मूर्तींचे दर 10 हजारांच्या घरात पोहोचल्याने अनेकांचे बजेट कोलमडले असून इतर साहित्याचे दरही महागल्याने यावर्षी बाप्पाची सेवा अनेकांना चांगलीच महाग पडण्याची शक्यता आहे.
वाडा तालुक्यातील घराघरात गणपती बाप्पाचे आगमन होत असून अतिशय भावनिक असणार्या या विषयात आर्थिक गणिताचा फारसा विचार केला जात नाही. दीड ते दोन दिवसांसह अनेकांकडे पाच दिवसांसाठी बाप्पाचा मुक्काम असून यादरम्यान बाजारात मोठी आर्थिक उलाढाल होते. डेकोरेशन , विद्युत रोषणाई, अन्नदान, मिठाई, पूजेचे साहित्य, फुलं, फळ, प्रसाद, अल्पोपहार, शीतपेय यासह मिरवणूक व विसर्जनासाठी मोठा आर्थिक खर्च येत असतो. त्यातच वाडा शहरात काही प्रसिद्ध मूर्तिकारांकडे मूर्तीचे दर गगनाला भिडल्याचे भाविक सांगतात.
घरगुती मूर्तींचे दर दहा हजारांवर गेल्याने अनेकांचे बजेट कोलमडत असून भावनेच्या आडून होणारी ही लूट थांबणार कशी असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पूर्वीपेक्षा हल्ली मूर्तींचे स्वरूप बदलले असून इमिटेशन ज्वेलरी व अन्य सजावटीमुळे मूर्तींची किंमत अजून वाढत असल्याचे मूर्तिकार सांगतात. तालुक्यातील पाली, गोर्हे, कुडूस व शिरीषपाडा या ठिकाणी आजही मूर्तींचे दर स्थिर आहेत मात्र वाडा शहरातील काही मूर्तिकारांकडून भाविकांना दिला जाणारा दरवाढीचा शॉक धक्कादायक असल्याचे बोलले जात आहे.
पीओपी माध्यमात बनविल्या जाणार्या मूर्तींची मागणी आजही मोठी असून यावर्षी असणार्या 10 हजारांच्या मूर्तींचे दर मागील वर्षी अडीच ते तीन हजारांवर असल्याचे भाविक सांगतात. अचानक यावर्षी वाढलेले दर ग्राहकांच्या पचनी पडत नसून भाविकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. मंडळाच्या मूर्तींचे दर देखील कमालीचे वाढले असून याचा फटका वर्गणीदारांना सोसावा लागणार असल्याचेही बोलले जात आहे.