बोईसर : फुलाचा पाडा जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर ‘पुढारी’ने बुधवारी प्रकाशित केलेल्या वृत्ताचा थेट परिणाम जिल्हा परिषद प्रशासनावर झाला आहे. तब्बल 27 विद्यार्थ्यांवर एकाच शिक्षिकेचा अन्यायकारक ताण टाकल्याची बाब ‘पुढारी’ने उघड केल्यानंतर शिक्षण विभागाची चांगलीच धांदल उडाली होती.
या प्रकरणी जिल्हा परिषद सीईओ मनोज रानडे यांना ‘पुढारी’ने विचारणा केली असता त्यांनी शाळेतील परिस्थितीबाबत अनभिज्ञता व्यक्त करत तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर काही तासांतच प्रशासन हलले आणि नियुक्त शिक्षिका तृप्ती गावड यांना सोमवारी फुलाचा पाडा शाळेत अनिवार्यपणे हजर राहण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
8 ऑक्टोबर रोजी शिक्षिका रक्षा संखे यांची बदली झाल्यानंतर मुरबे येथील तृप्ती गावड यांची फुलाचा पाडा शाळेत नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्या 15 ऑक्टोबरला एकदाच शाळेत हजर राहिल्या आणि त्यानंतर पुन्हा कधीच रुजू झाल्या नाहीत, असे वास्तव ‘पुढारी’ने उघड केले होते. धक्कादायक बाब म्हणजे, त्या प्रत्यक्षात मुरबे बंदरपाडा शाळेत कार्यरत असूनही पगार मात्र फुलाचा पाडा शाळेतूनच घेण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला होता.
या गैरजबाबदार वागणुकीमुळे पालक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी उसळली होती. मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी एका शिक्षिकेवर सोपवणे, हा विद्यार्थ्यांवर अन्याय असल्याची भावना पालकांनी दृढपणे व्यक्त केली. “27 मुलांचे भवितव्य असताना दुसरी शिक्षिका का देत नाही?” असा थेट सवाल त्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना केला. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने पालक संतप्त झाले होते.