Fourth Mumbai Project Pudhari
पालघर

Fourth Mumbai Project| चौथी मुंबई गेमचेंजर ठरणार: मुख्‍यमंत्री

विकासाचे कॉरिडॉर निर्माण करणार; बुलेट ट्रेन पुढील वर्षी धावेल

पुढारी वृत्तसेवा

हनिफ शेख

पालघर: चौथी मुंबई उभारण्‍याच्‍या कामाने वेग घेतला असून पुढील पाच वर्षांत वेगवान पद्धतीने कामे करून हा प्रकल्‍प पूर्ण केला जाईल. चौथ्‍या मुंबईत विकासाचे कॉरिडॉर निर्माण केले जाणार असून यामुळे हा प्रकल्‍प राज्‍याच्‍याच नव्‍हे तर देशाच्‍या विकासाच्‍या दृष्‍टीने गेमचेंजर ठरेल, असा विश्‍वास मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि. २८) व्‍यक्‍त केला.

राज्याच्या पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकासाला नवी गती देणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा प्रत्यक्ष आढावा घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालघर जिल्ह्याचा दौरा केला.

यावेळी वाढवण बंदर, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प, प्रस्तावित वाढवण आंतरराष्ट्रीय विमानतळ, नारिंगी खाडी पूल आणि उत्तन-विरार सागरी सेतू या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या कामांची पाहणी करून संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

यानंतर त्‍यांनी पालघर हा देशाच्या नकाशावर सर्वात विकसित जिल्हा म्हणून पुढे येत असून सर्वात वेगवान बुलेट ट्रेन २०२७ ला सुरू होईल. आंतरराष्ट्रीय वाढवण बंदरासाठी ४० टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष काम महिनाभरात सुरू होईल.

स्थानिकांना सोबत घेऊनच हा विकास केला जाईल आणि सर्वात वेगवान चौथी मुंबई प्रकल्‍प पुढील पाच वर्षात आकाराला येईल, अशा महत्वपूर्ण घोषणा केल्‍या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालकमंत्री व वनमंत्री गणेश नाईक, बंदर व मत्स्य विकास मंत्री नितेश राणे, पालघरचे खासदार डॉ. हेमंत सावरा, पालघरचे आ. राजेंद्र गावीत आणि जिल्हाधिकारी व स्थानिक प्रशासनाचे अधिकारी यांच्यासमवेत सुरुवातीला उद्योग नगरी बोईसर येथील बुलेट ट्रेनच्या स्थानकाची आणि कामाची पाहणी केली. तद्‌नंतर आंतरराष्ट्रीय वाढवण बंदराच्या कामाचाही आढावा घेतला. यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी वरील घोषणा केल्या.

वाढवण ठरणार सर्वांत खोल समुद्री बंदर

चिंचणी येथील समुद्रकिनाऱ्यावर प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाची पाहणी करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी अंतर्गत रस्त्यांचे जाळे, वन मंजुरी, वीजपुरवठा, रेल्वे कनेक्टिव्हिटी, भूसंपादन, पाणीपुरवठा, कौशल्य विकास तसेच मच्छीमारांच्या नुकसानभरपाई संदर्भातील कामांचा सविस्तर आढावा घेतला.

सुमारे ७६ हजार २२० कोटी रुपये खर्चाच्या या ग्रीनफिल्ड बंदराची उभारणी १,४४८ हेक्टर क्षेत्रावर होणार असून पुढील ६० महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. अत्याधुनिक नेक्स्ट जनरेशन जहाजे हाताळण्याची क्षमता असलेले हे बंदर भारतातील सर्वात मोठ्या खोल समुद्री बंदरांपैकी एक ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT