बंदीचा काळ वाढवल्यास मासेमारी ठरणार आशादायी 
पालघर

बंदीचा काळ वाढवल्यास मासेमारी ठरणार आशादायी

fishing news | मच्छिमारांच्या स्वघोषित बंदीमुळे गेल्यावर्षी उत्पन्नात झाली होती वाढ

पुढारी वृत्तसेवा

पालघर : निखिल मेस्त्री

राज्यात सध्या मत्स्य व्यवसायात कमालीची घट दिसून आली आहे. हवामान बदलासह अपरिमित मासेमारी, बेसुमार लहान आकारमानांच्या माशांची मासेमारी, पर्ससीन, ट्रॉलर्स, एलईडी मासेमारी, परकीय मच्छीमारांची घुसखोरी, समुद्री प्रदूषण, समुद्री परिसंस्थेवर झालेला परिणाम, प्रजनाच्या पोषक वातावरणाअभावी मत्स्य साठ्यांचे होणारे स्थलांतर आदी कारणांमुळे मत्स्यउत्पन्न घटक चालले आहे.

मत्स्य उत्पन्न घटल्यामुळे मत्स्य सहकार क्षेत्रावर संकटाचा डोंगर समोर आहे. या क्षेत्रावर असलेल्या रोजगाराच्या साखळी- वरही मोठा परिणाम दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पावसाळ्याच्या मासेमारी बंदीचा कालावधी ९० दिवसाचा केल्यास शाश्वत मासेमारी आशादायी ठरणार असल्याचे मच्छीमारांकडून अधोरेखित केले जात आहे. तर राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडून जून ते ऑगस्ट अशी ६० दिवसाची मासेमारी बंदी कालावधी जाहीर केला जातो.

या कालावधीत समुद्रात विपुल प्रमाणात माशांचे प्रजनन होते. यामुळे मत्स्य साठ्यामध्ये वाढ होत असली तरी अलीकडच्या काळात ही वाढ कमी असल्याचे सांगितले जाते. मत्स्य प्रजननाचा कालावधी वाढवल्यास मत्स्य साठ्यांमध्ये भरघोस वाढ होणार असल्याचे मत मच्छीमारांचे आहे.

एकीकडे राज्य शासनाने ६० दिवसांच्या मासेमारीचा कालावधी जाहीर केला असताना दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी मच्छीमार समाज व संघटनांनी गतवर्षी स्वघोषित ९० दिवसाची मासेमारी बंदी केल्यामुळे व त्याची अंमलबजावणी केल्यामुळे मत्स्य उत्पादनात गेल्यावर्षी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे ९० दिवसाची मासेमारी बंदी बंधनकारक करण्याची मागणी या निमित्ताने मच्छीमार संघटना करत आहेत.

प्रत्येक प्रजातीच्या माशांची प्रजनन क्षमता वेगवेगळी असते. अंडी घालण्याचा काळ पावसाळा असला तरी प्रत्येक मासा, संबंधित मोसमात किती अंडी घालणार, कुठे अंडी घालणार यासाठी पावसाळ्यातील वातावरण, पाण्यातील पोषक घटक, पाण्याचा सामू, क्षारता आणि तापमान हे घटक महत्त्वाचे आहेत. त्यामुळे पावसाळ्यातील महत्त्वाच्या माशांचे प्रजनन आणि पुढील महिन्यात होणारी पिलांची वाढ लक्षात घेता, या दरम्यान मासेमारी बंदी पाळणे महत्त्वाचे आहे.

बंदीचा कालावधी वाढवला गेला तर लहान माशाना वाढ होण्यासाठी अनुकूल वातावरण व कालावधी मिळतो. त्यामुळे लहान माशाच्या तुलनेत मोठ्या माशाची मासेमारी होऊन मत्स्यउत्पादनात व उत्पन्नात भर पडते. त्यामुळेहा बंदी कालावधी वाढवणे आवश्यक ठरणारआहे. सरकारच्या समुद्री शास्त्रज्ञामार्फत अभ्यास केल्यानंतर शासकीय दृष्ट्या मासेमारी बंदीचा कालावधी दोन महिन्याचा करण्यात आला आहे. तरी अलीकडच्या काळामध्ये बदलते ऋतुचक्र, माशांची प्रजनन क्षमता, समुद्रि क्षेत्रात होणारे बदल, प्रजननासाठी असणारे उपयुक्त वातावरण, माशांची खाद्य साखळी, बदलती समुद्री परिसंस्था, स्थलांतर अशा सर्व गोष्टींमध्ये बदल झालेले आहेत.

त्यामुळे या सर्वांचा समुद्र जैव तसेच परिसंस्था यांचा सर्वांकष, सविस्तर अभ्यास करून कालावधी वाढवण्याचा विचार करणे गरजेचे असल्याचे समुद्री जैव अभ्यासकांचे म्हणणे आहे. पावसाळी मोसमामध्ये मासे किनारपट्टी भागात प्रजनन करत असतात. या ठिकाणी त्यांना पौष्टिक खाद्य, कांदळवन, प्रवंग, खाद्य प्रजननासाठी आवश्यक वातावरण, अंडी घालण्यासाठी असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण जागा, लहान मासे सदृश खाद्यांची उपलब्धता अशा गोष्टींची आवश्यकता असते. अलीकडच्या काळामध्ये या सर्व साखळीवर परिणाम झाल्यामुळे मासे पोषक वातावरणासाठी इतरत्र स्थलांतर होत आहेत. त्यामुळेही मत्स्यउत्पादनामध्ये घट दिसून येते.

सागरी मासेमारी नियमन अधिनियमानुसार १ जून ते ३१ जुलैपर्यंत राज्याच्या जलधी क्षेत्रात मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारीस बंदी असते. या कालावधीत मासळीच्या जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते. तसेच या कालावधीत खराब, वादळी हवामानामुळे होणारी मच्छीमारांची जीवित व वित्तहानी टाळता येणे शक्य होते. त्यामुळे या कालावधीत यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे.

ही पावसाळी मासेमारी बंदी यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना लागू असते. ही बंदी पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यंत्रचलित नौकांना लागू राहणार नसते. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर (सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपुढे) खोल समुद्रात मासेमारीस जाणाऱ्या नौकांना केंद्र शासनाच्या खोल समुद्रातील मासेमारीबाबतचे धोरण, मार्गदर्शक सूचना, आदेश लागू असतात.

राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत) यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास, केल्यास नौका व नौकेवर बसवलेली उपसाधने व मासेमारी सामग्री आणि त्यामध्ये सापडलेली मासळी जप्त करण्यात येते.

ऋतुचक्र बदलत चालले आहे. प्रजननाचा काळही त्यानुसार बदलत आहे. माशांच्या प्रजननासाठी आवश्यक साखळी यांची उपयुक्तता पाहणे आवश्यक आहे. माशांच्या प्रजनानुसार बदल दिसू लागले आहेत. ठराविक आकाराच्या लहान वयातच प्रजनन क्षमता दिसून येत आहे. त्यामुळे एकंदरीत समुद्री परिसंस्था यावर परिणाम दिसून येतो. या सर्वांचा सर्वांकष विचार करून तसेच सविस्तर अभ्यास करून मासेमारी बंदीचा कालावधी ठरवणे अपेक्षित आहे.
- डॉ. स्वप्नजा मोहिते, मत्स्य जीवशास्त्र विभाग, मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT