बोईसर, पुढारी वृत्तसेवा : टॅप्स हॉस्पिटलसमोर भरधाव कारच्या धडकेत ७० वर्षीय वृद्धेचा जागीच मृत्यू झाला. भरधाव कार डॉक्टर चालवत होता. ही घटना आज (दि.९) सकाळी घडली. छायालता विश्वनाथ आरेकर (वय ७०, रा. गेली, ता. व जिल्हा. पालघर) असे मृत वृद्धेचे नाव आहे. (Palghar Accident)
याबाबत अधिक माहिती अशी की, मृत छायालता पतीच्या उपचारासाठी टॅप्स हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या. आज सकाळी सुमारे ८. ५५ च्या सुमारास भरधाव कार रुग्णालयाच्या आवारात घुसली आणि त्यांना धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या कारचे मालक व चालक डॉक्टर आर. के. दास असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे टॅप्स हॉस्पिटलच्या आवारात केवळ रुग्णवाहिकांना प्रवेश दिला जातो, अशा परिस्थितीत खासगी वाहन आत कसे आले, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मृत महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टरवर गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर रूग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला. नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत होता. पोलिस उपविभागीय अधिकारी विकास नाईक यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.