नवसाला पावणारी, हाकेला धावणारी आई एकविरा देवी Pudhari Photo
पालघर

नवसाला पावणारी, हाकेला धावणारी आई एकविरा देवी

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे : विश्वनाथ कुडू

नवसाला पावते म्हणून आम्हाला खाडीत चांगले म्हावरे मिळते या श्रद्धेपोटी कळंब आणि रावार गावाच्या दरम्यान असलेल्या खाडीतील खडकावर ताडांच्या व माडांच्या झावळ्यांनी साकारलेल्या मंदिरात खाडी परिसरातील गावकरी पूर्वीपासून पूजा करत आहेत. मात्र आता या चिखलातील खडकावर प्रशस्त असे एकविरा देवी मंदिर उभे राहिले आहे.

येथे वर्षभर धार्मिक कार्यक्रम साजरे होत असून दरवर्षीप्रमाणे या स्वयंभू एकविरा देवी मंदिरात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे. नऊ दिवस सुरू असलेल्या या उत्सवात सहभागी होऊन भाविकांनी भंडारा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन 'श्री एकविरा देवी सेवा कमिटी', कळंब यांच्यामार्फत करण्यात आले आहे. वसई तालुक्यातून अनेक भाविक या ठिकाणी दरवर्षी दाखल होतात. त्यामुळे दरवर्षी या मंदिरात जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. भाविक यथाशक्ती अन्नदान, द्रव्य दान करीत असतात.

नालासोपारा पश्चिमेस निर्मळ गावा नजिक रावार व कळंब या दोन गावांच्या खाडी मध्ये एकविरा देवीचे मंदीर आहे. आता हे प्रशस्त मंदीर दिसत असलं तरी फार पूर्वी या भागात चिखलामध्ये एक खडक होता. तेव्हा पासून मच्छीमार या खडकास देव समजुन पूजा करीत असत. सदर काळ्या खडकावर असलेल्या श्रध्देपोटी केलेल्या पूजेमुळे या खाडीतून चांगल्या प्रमाणात मासळी मिळते अशी त्यांची श्रद्धा होती. कालांतराने येथील स्थानिकांना विविध स्वरूपातून प्रचिती आल्याने येथे भगवा झेंडा रोवला. मात्र उत्सवाच्या दृष्टीने परीसर योग्य नसल्याने तसेच वर्षभर चिखल व पाणी असल्याने भांग असलेला दिवस अथात ओहोटी लागलेल्या दिवशी या खडकाची पुजा अर्चा करून उत्सव साजरा करण्यात येत होता. त्यांत एका स्थानिकाला मिळालेल्या दृष्टांतामुळे हे दैवत एकविरा देवी असल्याचे प्रचलित झाले. त्या जुन्या काळी दरवर्षी या प्रकारे उत्सव साजरे होऊ लागले. लोकवर्गणीतून या ठिकाणी आज भव्य मंदीर उभे राहिले आहे.

वसईत खाडीच्या खडकावर प्रशस्त मंदिरात नवरात्रोत्सव

• निर्मळ गावं ही भगवान परशुरामाची भुमी. त्यांची आई एकविरा मानली जाते. त्यामुळे नजीकच आपलं अस्तित्व दाखवल्याचा स्थानिकाचा विश्वास आहे.

• कोळी, आगरी, भंडारी व अन्य समाजाचे हे कुलदैवत आहे. दरवर्षी चैत्र अष्टमीला येथे उत्सव साजरा होतो. मूळ एकविरा मंदीर लोणावळ्या नजीक कार्ला लेण्यांत आहे. ज्यांना तिथे जाणं शक्य नाही ते वसईत दर्शन घेतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT