डहाणू : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी पालघर जिल्ह्याच्या दौर्यावर केलेल्या भाषणातील एक वक्तव्य चर्चेला कारण ठरले आहे. ‘रावणाची लंका अहंकारामुळे जळून खाक झाली, आता तुम्हाला एकाधिकारशाही आणि अहंकार संपवायचा आहे,’ असे वक्तव्य शिंदे यांनी केल्याने त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या नाराजीनाट्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केल्यामुळे त्यांनी भाजपवर तर टीका केली नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यामुळे आता पुढे राजकीय कोलाहल होणार आहे, हे मात्र निश्चित आहे.
भारतीय जनता पक्षाच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही काळापासून भाजपवर नाराज आहेत. शिवसेनेचे (शिंदे) मंत्री, खासदार आणि आमदारांच्या मतदारसंघांत समांतर नेतृत्व भाजपच्या राज्यातील नेत्यांकडून उभे केले जात आहे. शिंदेंचा बालेकिल्ला असलेला ठाणे आणि त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्याच (शिंदे) पदाधिकार्यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यानंतर शिंदे आणि भाजपमधील वाद चव्हाट्यावर आला. त्यातच आता महायुतीत शिंदे यांच्या वक्तव्याने पुन्हा ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी शिंदे यांची शनिवारी (दि. 22) डहाणूत सभा पार पडली. यावेळी त्यांनी शिवसेनेचे डहाणू नगरपरिषदेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजू माछी आणि त्यांच्या सहकार्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. ‘मी आपल्याला एवढेच सांगतो, डहाणूत आपण सर्वजण एकत्र आला आहात. एकाधिकारशाहीच्या विरोधात एकत्र आलेला आहात. अहंकाराच्या विरोधात एकत्र आलेला आहात. रावणाचा अंहकार होता; पण रावणाची लंका अहंकारामुळे जळून खाक झाली. तुम्हाला 2 तारखेला तेच करायचे आहे,’ असे वक्तव्य शिंदे यांनी केले. ‘तुम्हाला भ्रष्टाचार संपवायचा आहे. या ठिकाणी विकासाला आणायचे आहे,’ असेदेखील शिंदे म्हणाले. दरम्यान, नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांत शिवसेना आणि भाजप यांच्यात काही ठिकाणी थेट सामना होत आहे अन् त्यातच शिंदेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय कोलाहल होणार आहे, हे मात्र निश्चित आहे.
महिला शक्तीबाबत बोलताना त्यांनी, लाडक्या बहिणींचे कौतुक केले. महाराष्ट्रातील सत्तापालट लाडक्या बहिणींनी घडवला. लाडकी बहीण योजना काही लोकांनी बंद करण्याचा प्रयत्न केला; पण मी दिलेला शब्द पाळतो. ही योजना कधीही बंद होणार नाही, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून आतापर्यंत 70 हजार रुग्णांना मदत देण्यात आल्याची माहितीही शिंदेंनी सभेत दिली.