विरार, पुढारी वृत्तसेवा : पालघर जिल्ह्यातील विरार शहरात रामनवमीनिमित्त निघालेल्या मोटारसायकल रॅलीवर अज्ञातांनी अंडीफेक केल्याची खळबळजनक घटना घडली. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. रॅलीत सहभागी असलेल्या भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली. रविवारी रात्री विरार पश्चिमेकडून निघालेल्या रामनवमीच्या भव्य रॅलीमध्ये शेकडो युवक आणि भक्तगण सहभागी झाले होते. रॅली एका विशिष्ट भागातून जात असताना अज्ञातांनी अचानक अंडीफेक केली. यामुळे काही काळ गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध धार्मिक भावना दुखावणे आणि खोडसाळपणाच्या हेतूने केलेल्या कृत्यांबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाकडून शांतता राखण्यासाठी अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. संशयितांचा शोध सुरू असून, परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.