हनिफ शेख
पालघर: पावसाळ्याला दोन ते तीन आठवडे बाकी राहिल्याने शुक्रवारच्या आठवडे बाजारात सुकी मच्छी घेण्यासाठी खवय्यांनी गर्दी केली होती. यावर्षी सुक्या मच्छीला भाव चांगला मिळत असल्याने विक्रेत्यांना त्याचा फायदा होत आहे. मात्र दुसरीकडे बाजारभाव ऐकल्यावर खवय्यांचे तोंडचे पाणी पळत आहे.
सर्वाधिक भाव हा सुकेसोडे (कोलंबी) ला मिळत असून अडीच हजार रुपये किलोने ते विकले जात आहे. त्याच्या खालोखाल दाढ्याचं व गोळीच्या खाऱ्याचा दर दोन हजार रुपये व 1800 रुपये किलो आहे.
पालघरचा शुक्रवारचा आठवडे बाजार हा ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठा आठवडी बाजार ,टोपली मडकी,मसाला,चिंच कडधान्य सफेद कांदा,लसुन, शोभेच्या वस्तू, कपडे इमिटेशन ज्वेलरी या वस्तूंनी हा बाजार भरलेला असतो. शुक्रवारी कंपन्यांना सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणात या बाजारात गर्दी होत असते.
साधारण दोन किलोमीटर लांबीचा हा बाजार रस्त्याच्या दुतर्फा गेल्या अनेक वर्षापासून दर शुक्रवारी भरत असतो. शुक्रवारच्या बाजारातील सुकी मच्छी ताजी असल्याने पालघर जिल्ह्यासह ठाणे नाशिक जळगाव इथले खवय्ये व व्यापारी सुकी मच्छी घेण्यासाठी आवर्जून येत असतात.
अवकाळी पाऊस पडल्याने मच्छीमारांना नुकसानीस सामोरे जावे लागल्याने सुक्या मासळीचा दर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शंभर रुपयाला मिळणारी सुकी मासळी 300 ते 400 रुपयापर्यंत गेली आहे. मात्र पावसाळ्यात समुद्रातील मासेमारी बंद होत असल्याने खवय्यांना सुक्या मासळीचा आधार घ्यावा लागतो.
तसेच नोकरीला जाणारे आपल्या रोजच्या आहारात सुद्धा सुकी मासळी घेऊन जात असतात. सुके बोंबील हा सगळ्यांचा आवडता प्रकार बोंबला मध्ये छोटे मोठे निरल्या असे प्रकार असून पाचशे रुपये 450, 350, 300, 200 रुपये शेकडा (100) दराने बोंबलाला भाव मिळत आहे. सुकी करंदी 600 रुपये किलो आहे.
शंभर रुपयाला एक पायली डब्बा ने विकली जाते. तर जवळा हा दोनशे रुपयाला तीन डबे प्रमाणे विकला जात आहे. मांदेळी माकल्या ह्या वाट्यावर विकल्या जात असून पन्नास रुपये दर त्याला मिळत आहे. वाकट्या व दांडी सुकट 100 रुपये वाट्याने विकली जात आहे. दाढा व घोळला मोठी मागणी आहे. दाढा हा दोन हजार रुपये किलोने तर घोळ मासा हा 1800 रुपये किलोने विकला जात आहे.
सुक्या मासळीमध्ये सर्वात महाग सोडे (कोलंबी) असून त्याचा दर बाजारात अडीच हजार रुपये व दोन हजार रुपये किलो आहे. सुक्या मासळीचे भाव वाढत असले तरी पावसाळ्यात मासळीची व्यवस्था झाली पाहिजे. या भागातील नागरिक दररोज शाकाहारी खाऊ शकत नसल्याने खाण्याच्या वाराच्या दिवशी आंबट कालवण खालच पाहिजे त्याशिवाय इथली लोकं राहूच शकणार नाहीत. खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवायचे असतील तर सुकी मासळी महाग असली तरी ती घ्यावीच लागत आहे.
पालघर आणि किनारपट्टी भागात माशांबरोबरच सुकी मासळी देखील मोठ्या प्रमाणावर मिळते यामध्ये बोंबील सुकट बरोबरच सुके सोडे म्हणजेच कोलंबी याशिवाय दाढा आणि घोळ हे देखील सुके मासळीमध्ये मिळत असतात.
मात्र किनारपट्टी जवळच या सुक्या मासळीचे भाव गगनाला भिडल्याने बाकी जिल्ह्यात तर हा सुका मासा अतिशय मोठ्या प्रमाणावर महाग झालेला असणार याबाबत दुमत नाही याशिवाय बाहेर जिल्ह्यात सुकट आणि शक्यतो बोंबील हेच विक्रीसाठी उपलब्ध असून त्यांचे देखील भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. मुळात घरात शाकाहारी जेवण जरी बनले तरी तोंडी लावायला या सुक्या माशांना मोठ्या प्रमाणावर मागणी प्रत्येक घरात असते मात्र या सुक्या मासळीचे भाव वाढल्याने खवय्यांचा मात्र चांगलाच हिरमोड झाला आहे.