Diwali 2024 File Photo
पालघर

Diwali 2024 | दिवाळी सणोत्सवात खराखुरा आनंद देणारी शुभेच्छापत्रे होतायेत कालबाह्य

समाजमाध्यमांमुळे उतरती कळा; पारंपरिक कलाकारांना बसतोय आर्थिक फटका

पुढारी वृत्तसेवा

सफाळे : पुढारी वृत्तसेवा

भारतीय संस्कृतीमध्ये सण- उत्सव यांना अनन्यसाधारण महत्व आहे. वेगवेगळ्या आपत्तीमध्ये सुद्धा येणारे वेगवेगळे सण मानवामध्ये नवचैतन्य निर्माण करून आपलं दुःख, दारिद्र्य विसरायला लावून नव्या उमेदीने जीवन जगायला लावतात हे वारंवार सिद्ध झालं आहे. सोशल मीडियाच्या वापरामुळे या सणांसाठी दिली जाणारी शुभेच्छा पत्रे मात्र आता नामशेष होत आहेत.

(Diwali 2024)

या विविध सणांपैकी दिवाळी हा भारतातील एक अत्यंत महत्वाचा आणि मोठा सण आहे. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये मोठ्या दिमाखात दिवाळी साजरी केली जाते. देशातील अगदी गरीबातील गरीब मनुष्य सुद्धा आपापल्यापरीने हा सण साजरा करताना आपल्याला दिसून येतो.

दिवाळीच्या दिवशी श्रीराम १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परत आले होते आणि म्हणूनच प्रजाजनांनी संपूर्ण नगरीत दिवे लावून त्यांचे स्वागत केले होते, असे सांगितले जाते. वसुबारस ते भाऊबीज या कालावधीत दिवाळी साजरी केली जाते. अलीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देऊन सणाचा उत्साह द्विगुणित केला जात आहे.

गेल्या काही वर्षा पूर्वीचा इतिहास पाहिला तर दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिवाळी (ग्रीटिम्स) शुभेच्छा पत्राद्वारे अगदी सर्रासपणे दिल्या जात होत्या. ही शुभेच्छा पत्रे बहुतांश वेळी बाजारात जाऊन खरेदी केली जात असत किंवा काहीजण घरीच आकर्षक अशाप्रकारे शुभेच्छापत्रे बनवत असत.

शुभेच्छा पत्रांमधील मजकूर हा बहुदा हाताने लिहिलेला असायचा. त्यामुळे ज्यांना ही शुभेच्छापत्रे मिळत असत त्यांना खराखुरा आनंद या शुभेच्छा पत्राद्वारे मिळत असे. दिवाळीच्या दहा-पंधरा दिवस आधी ती पोस्टाने पाठवली जात असत. तेव्हा ती कधी दिवाळीला तर कधी दिवाळीनंतर संबंधितांना मिळत असत.

मात्र या शुभेच्छापत्रांची बरेच जण आतुरतेने वाट बघत असत. मात्र गत काही वर्षांचा इतिहास पाहिला तर फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आदी सोशल मीडियाच्या द्वारे शुभेच्छा दिल्या जात असल्याने शुभेच्छापत्रे ही दुर्मिळ झाली नसून ती पूर्णपणे नामशेष झाली असल्याचे दिसत आहे. विशेषतः पालघर जिल्ह्याचा विचार केला तर पालघर जिल्ह्यातील वारली पेंटिंग ही अत्यंत आकर्षक आणि महत्त्वाची मानली जाते.

गेल्या काही वर्षापूर्वी पेपरवर वारली पेंटिंग रेखाटून त्याची आकर्षक अशी ग्रीटिंग बनवण्याची परंपरा होती. अशा आकर्षक वारली शुभेच्छा पत्रांना बाजारात खूप मागणीसुद्धा होती. त्यामुळे कलाकारांना या माध्यमातून चांगला व्यवसाय मिळत असे. त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळत होते. मात्र सोशल मीडियाच्या अति हव्यासापोटी हे सर्व नामशेष होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT