पालघर: पालकमंत्री तथा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी आत्तापर्यंत पालघर येथे दोन जनता दरबार घेतले. त्यावेळी अनेकदा शहरी मुद्दे घेण्यात आले मात्र अगदी काल परवाच जव्हार तालुक्यामध्ये जनता दरबार घेण्यात आला जनता दरबार सुरू होण्याच्या अगोदर शासकीय विश्रामगृह येथे अनेक सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ पत्रकार काही पदाधिकारी यांनी भेटी अंती या भागातील अनेक कामांचा उहापोह केल्याचे दिसून येत आले.
या तक्रार अर्जांची दखल घेत पालकमंत्री नाईक यांनी जलजीवन मिशन योजना याशिवाय पर्यटन स्थळांची कामे,जिल्हा परिषदेकडून केलेली कामे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केलेली कामे यांचा दर्जा आणि एकच काम मात्र बिले दोन्ही विभागाकडून काढल्याच्याही अनेक तक्रारी भेटल्याचे सांगत याचा लेखाजोखा मांडण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना थेट व्यासपीठावरून दिल्याने या भागातील मोठा भ्रष्टाचार समोर येण्याची चर्चा जोर धरत आहे.
आजवर या कामाविषयी अनेक तक्रारी होताना दिसत आहे.मात्र जिल्ह्याचे पालकमंत्रीतथा सत्ताधारी मंत्री यांनी थेट व्यासपीठावरून याविषयी बोलण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि ज्याप्रमाणे नाईक यांनी कामाचा सपाटा लावला आहे .त्यानुसार खरंच मोठा भ्रष्टाचार समोर येईल काय असा सवाल आता उपस्थित झाला आहे. विकास काम एकच आणि त्याचा निधी लाटताना मात्र जिल्हा परिषदेचे तेच काम दाखवायचे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची सुद्धा तीच काम दाखवायची तर कधीकधी नगरपंचायती,नगर परिषदांच्या सुद्धा त्याच कामावर बीले काढण्याच्या सुद्धा तक्रारी नाईक यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत.
याबाबत जव्हार येथे झालेल्या जनता दरबारामध्ये गणेश नाईक यांनी व्यासपीठावरूनच प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले. यावेळी दस्तर खुद्द नाईक यांनी सुद्धा 2019 पासून आत्तापर्यंत झालेल्या कामांचा दर्जा देखील सुमार आहे. अनेक ठिकाणी जलजीवन योजनेची कामे अपूर्ण आहेत. याशिवाय काम एकच आणि बिले विविध यंत्रणे कडून काढल्याच्या सुद्धा तक्रारी असल्याचे सांगत कामाची सद्यस्थिती, कामाचा दर्जा झालेले काम, कोणत्या यंत्रणेकडून झाले आहे या संदर्भातली पूर्व चौकशी करण्याचे या ठिकाणी नाईक यांनी आदेश दिले आहेत.
या भागातील विकास कामांचा नेहमीच ऊहपोह केला जातो मोठ्या प्रमाणावर निधी येऊन सुद्धा ह्या भागात हवा तसा विकास झालेला नाही. यामुळे अनेकदा कामे न करता बिले काढणे, गरजेच्या ठिकाणी कामे न करता ठेकेदाराच्या सोयीच्या ठिकाणी कामे करणे, जाणीवपूर्वक आवश्यकता नाही तिथे कामे करणे रस्त्याऐवजी संरक्षण भिंतींची कामे करणे अशा अनेक तक्रारी या जनता दरबारामध्ये समोर आल्या आहेत.
जव्हार नगर परिषदेमध्ये बनावट सही शिक्क्यांच्या आधारे सुमारे 21 कोटी रुपयांच्या विकास कामांमध्ये बनावट तांत्रिक मंजुरीच्या आधारे करण्यात आली.या संदर्भात तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने चौकशी करून या संदर्भातील अहवाल जानेवारी 2022 मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात सोपवण्यात आला होता. मात्र जव्हारच्या या गैरप्रकाराबाबत आजवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे दिसून आले आहे याबाबत सुद्धा गणेश नाईक यांना लेखी तक्रार आल्याचे बोलले जात असल्याने याचीही पुन्हा चौकशी होऊन दोशींवर कारवाई संदर्भात कडक पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.