Vaitarna River Bridge pudhari photo
पालघर

Vaitarna River Bridge : मुंबई, ठाण्यासह गुजरातच्या प्रवासाला मिळणार गती

वैतरणा पुलाचे काम अंतिम टप्प्यात; तलासरी ते बदलापूरपर्यंत वाहतूक सुरू होण्याचे संकेत

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे : दिल्ली आणि मुंबई या दोन महानगरांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या पालघर जिल्ह्यातील वैतरणा नदीवरील पुलाचे काम हे तेथील भौगोलिक परिस्थितीमुळे अडचणींचे ठरले होते. मात्र बांधकाम विभाग व इंजिनियर यांच्या अथक परिश्रमाने ते काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.

या पुलाचे काम वेगाने सुरू असून, डिसेंबरअखेर पुलाच्या एका बाजूचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे नवीन वर्षात तलासरी ते बदलापूरपर्यंतचा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. तसे संकेत मिळाल्याने पालघर जिल्ह्यासह मुंबई, ठाणे आणि गुजरातदरम्यानची वाहतूक अधिक जलद व सुलभ होणार आहे.

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. १३ नोव्हेंबर) पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत या प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली. पालघर जिल्ह्यातील तलासरी ते गंजाड (पॅकेज ११) आणि गंजाड ते मासवण (पॅकेज १२) या दोन्ही टप्प्यांतील काम पूर्ण झाले आहे. मात्र, मासवण ते विरार (पॅकेज १३) या टप्प्यातील वैतरणा नदीवरील पुलाचे काम बाकी असल्याने संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्यास विलंब होत आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी बैठकीत दिलेल्या माहितीनुसार, पुलाच्या एका बाजूचे काम डिसेंबरअखेर पूर्ण केले जाणार असून, उर्वरित काम फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. दरम्यान, उपलब्ध मार्गिकेवरून दोन्ही दिशांची वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्याचे नियोजन असल्याने वाहनचालकांना दिलासा मिळू शकतो.

मालवाहतुकीसह प्रवासी वाहतुकीलाही मिळणार गती

दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाची एकूण लांबी सुमारे १ हजार ३५० किलोमीटर असून, त्यापैकी १७ किलोमीटरचा भाग पालघर मधून जातो. त्यात तलासरी ते मुंबईदरम्यानचा सुमारे १५६ किलोमीटरचा मार्गही महाराष्ट्रात समाविष्ट आहे. वैतरणा पुलाचे काम पूर्ण होऊन हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर तलासरी, विरार आणि पुढे वडपे-आमणे मार्गे बदलापूरपर्यंतचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. विशेषतः कल्याण आणि भिवंडी परिसरातील वाहतूककोंडी टाळण्यास या मार्गाचा मोठा फायदा होणार असून, औद्योगिक वाहतूक, मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीलाही नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT