जव्हार : जव्हार-सेलवास रोड लगत असलेल्या गणेशनगर फाटा जव्हार येथे एक सफेद रंगाची कार थांबवून पोलिसांनी झडती घेतली असता, त्यात बेकायदेशीररित्या दमण बनावटीची दारू पोलिसांच्या हाती लागली. या कारवाईत ५ लाख १८ हजारांचा दारुचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या नेहमीच्या चोरट्यांकडून दमन दारू जप्त करून नुकतीच अटक केली आहे.
गुजरात येथील आरोपी सुरज रामजीत रॉय वय-३२ वर्ष, राहणार दमिनीझपा डोंगरी फलिया सोनिया रोड किल्ला ता-पारडी जि-वलसाड राज्य-गुजरात) तर दुसरा आरोपी सुनीलभाई रमेशभाई पटेल (वय-४० वर्षे रा. गुजरात) यांना अटक करण्यात आली आहे. हे दमण दारू तस्करी करणारे नेहमीचे चोरटे होते, याचा सुगावा जव्हार पोलिसांना लागला होता, ते नेहमी दारू पोहचवत होते, मात्र शेवटी हे दारू तस्करी चोरटे पोलिसांच्या हाती लागले असून, त्यांना जव्हार पोलिसांनी अटक केली आहे.
दमण दारु तस्करांविरोधात जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी समीर महेर, प्रभारी पोलीस निरीक्षक विजय मुतडक, पोलीस उपनिरीक्षक सुजित सोनवणे, पोलीस हवालदार प्रदीप विटकर, पोलीस नाईक विनोद वारंगडे, यांच्या टीमने ही कामगिरी केली.