Railway News  File Photo
पालघर

दहिसर-विरारदरम्यान रुळांच्या उंचीत वाढ नको

Dahisar Virar Flood Risk- पुढील पावसाळ्यात लगतच्या शहरांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती

पुढारी वृत्तसेवा

भाईंदर : यंदा पावसाच्या सुरुवातीलाच मुसळधार सुरू झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साठले. त्यात पश्चिम रेल्वेच्या सेवेवर मोठा परिणाम झाल्याने रेल्वेचे मोठे आर्थिक नुकसान झाले. यावर उपाय म्हणून पश्चिम रेल्वे प्रशासनाने दहिसर ते विरार दरम्यानच्या रेल्वे रुळांची उंची वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला विरोध दर्शवित माजी नगर-सेवक रोहिदास पाटील यांनी रुळांची उंची वाढविल्यास लगतच्या शहरात पुढील पावसाळ्यात यंदा पेक्षा जास्त पाणी साठून शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली आहे.

त्यांनी या रेल्वे रुळाच्या उंची वाढीला विरोध दर्शवित तसे पत्र पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे. यंदाच्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजविल्याने ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी पाणी साठले होते. अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळे रेल्वे सेवांवर तीव्र परिणाम झाला. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

पावसामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता लाखो लोकांचे संसार वाहून गेले, वीजयंत्रणा, रस्ते, वाहतुक यंत्रणा व रेल्वे वाहतूक यंत्रणा पूर्णपणे कोलमडून करोडोंचे आर्थिक नुकसान झाले. विरार येथील रेल्वे रूळावर मोठ्याप्रमाणात पाणी वाहून आल्यामुळे रेल्वेची लोकल सेवा बंद पडून लांब पल्ल्यांच्या अनेक गाडया रद्द कराव्या लागल्या. ही परिस्थिती नैर्गिक नसून मानवनिर्मित असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

वैतरणा खाडीमध्ये पाण्याचा प्रचंड प्रवाह वाढल्याने प्रथमच वैतरणा गावाला तर भाईंदर खाडीतील पाणजू गावाला पुराचा धोका निर्माण झाला होता. नैसर्गिक खाड्यांमधून मोठ्या पडावातून (बोटीतून) मीठ व भाताचा व्यापार होत होता तेथील खाडीत भराव झाल्याने समुद्रातील पाण्याचा प्रवाह कमी होऊन परिणामी समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली आणि हा व्यापार कायमस्वरूपी बंद झाला. अशा परिस्थितीत मुसळधार पाऊस झाल्यास व समुद्राला उधाण आल्यास पावसाळी पाण्याचा निचरा ठप्प होऊन सर्वत्र मोठ्याप्रमाणात पाणी साठते. यंदा देखील पावसाच्या सुरुवातीलाच अशी परिस्थिती उद्भवल्याने त्याचा परिणाम रेल्वे सेवेवर सुद्धा झाल्याचे दिसून आले. यावर उपाय म्हणून पश्चिम रेल्वे प्रशासनाने दहिसर ते विरार दरम्यानच्या रेल्वे रूळांची उंची वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. रुळांची उंची वाढल्यास दहिसर ते विरार पट्टयातील आसपासच्या लोकवस्त्यांत मोठ्याप्रमाणात पाणी शिरून तेथे पूरसदृश परिस्थिती उद्भवण्याची मिती पाटील यांनी व्यक्त केली आहे.

त्यामुळे पुढील वर्षात पावसाचे पाणी साठू नये म्हणूनरेल्वे रूळाची उंची वाढविणे हा पर्याय ठरू शकणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसे पत्र त्यांनी पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे. त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करून पश्चिम रेल्वे प्रशासनाला रल्वे रूळाची उंची वाढविण्यास परावृत्त करावे व त्याला पर्याय म्हणून इतर कायम-स्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे. नायगांव ते विरार स्थानकांच्या दरम्यानच्या रेल्वे रुळांखाली प्रत्येकी दोन जास्त क्षमतेचे कल्वर्ट बांधण्याची सूचना त्यांनी केली आहे. जेणेकरून मुसळधार पावसाचे पाणी रेल्वे स्थानक परिसरातील रुळांवर न साठता त्याचा तात्काळ निचरा होईल, असा दावा त्यांनी केला आहे. रुळांची उंची वाढविल्यास निर्माण होणारी परिस्थिती पाहता रेल्वे रूळांची उंची वाढवू नये अशी मागणी होत आहे.

रेल्वे रूळ ४०० मिमीने वाढवण्याचा निर्णय

पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने वसई-विरार दरम्यानचे रेल्वे रूळ ४०० मिमीने (अंदाजे दीड फूट) उंचावण्याचा आणि नवीन मार्गिका उच्च पातळीवर बांधण्याचा निर्णय घेतला आहे. तीव्र मान्सूनमध्ये दरवर्षी तुंबणाऱ्या पाण्याचा हा कायमस्वरूपी उपाय म्हणून पाहिला जात असला, तरी परिसरातील नागरिकांमधून यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान पूर स्थिती उ‌द्भवू नये यासाठी येथील रेल्वे रुळाची उंची वाढवू नये अशीच मागणी पुढे येत आहे. शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT