पालघर

Dahanu Crime: बाईकवरुन आले, गोळ्या झाडल्या, लाखोंचे दागिने चोरले; डहाणूत दिवसाढवळ्या दरोड्याची घटना

अवघ्या काही मिनिटांत दरोडा, सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

डहाणू : डहाणू शहरातील इराणी रोडवरील न्यू लक्ष्मी ज्वेलर्स या सराफा दुकानावर सोमवारी (दि. २० जुलै) सायंकाळी सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास तीन सशस्त्र दरोडेखोरांनी भरदिवसा धाडसी दरोडा टाकत लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. या थरारक घटनेमुळे व्यापारी वर्गासह नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तीन अज्ञात दरोडेखोर थेट न्यू लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानात घुसले. त्यांनी दुकानाच्या समोरील काचेवर गोळीबार करून दहशत निर्माण केली. त्यानंतर दुकानमालकाला बंदुकीचा धाक दाखवत दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने गोणीत भरले आणि अवघ्या काही मिनिटांत तेथून पसार झाले. आरोपी घटनास्थळावरून मोटारसायकलवरून फरार झाल्याचा व्हिडिओ समोर आला असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

ही संपूर्ण घटना दुकानातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली आहे. घटनेच्या वेळी अनेक नागरिक परिसरात उपस्थित होते. काहींनी या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार असल्याचे सांगितले जात आहे. भरदिवसा शहराच्या मध्यवर्ती भागात अशा प्रकारचा सशस्त्र दरोडा पडल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच डहाणू पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे संकलित करण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असून विविध अंगांनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, शहराच्या मध्यवर्ती भागात भरदिवसा घडलेल्या या धाडसी दरोड्यामुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींना तातडीने अटक करून गुन्ह्याचा छडा लावावा, अशी मागणी व्यापारी आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT