डहाणू : डहाणू शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना श्वान दंशानंतर दिल्या जाणाऱ्या रेबीज लसीच्या तुटवड्याचा फटका बसत आहे. डहाणू उपजिल्हा रुग्णालयात मागील आठवड्यातच लसीचा साठा संपला असून, यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयांतून महागड्या दराने लस घ्यावी लागत आहे. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. सरकारी रुग्णालयात लस विनामूल्य उपलब्ध असताना, ती खासगी रुग्णालयात महागात मिळत असल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. श्वान दंशाच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे रेबीज लसीची गरज मोठ्या प्रमाणात भासत आहे. या समस्येबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामदास मराड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, डहाणू उपजिल्हा रुग्णालयासाठी लसीचा तात्काळ पुरवठा करण्यात येईल.
अर्बन प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीची तरतूद नसल्यास त्यावर देखील ठोस उपाययोजना केली जाईल. डहाणूतील काही रुग्णांनी अर्बन प्राथमिक आरोग्य केंद्रात लस मिळण्याच्या आशेने संपर्क साधला होता, मात्र तेथेही लस उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. यामुळे रुग्णांच्या उपचारांमध्ये अडथळे येत असून, त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
या परिस्थितीमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. कासा उपजिल्हा रुग्णालयातही काही महिन्यांपूर्वी याच समस्येला सामोरे जावे लागले होते, मात्र सध्या तेथे लस उपलब्ध असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्हा प्रशासनाकडून लवकरच लस उपलब्ध होण्याचे आश्वासन मिळाले असले तरी, तातडीच्या काळात रुग्णांना याचा किती फायदा होईल, हा प्रश्न अद्याप कायम आहे.
या लसीचा तुटवडा होता, मात्र तत्काळ डहाणू उपजिल्हा रुग्णालयासाठी लस पाठविली जाईल. अर्बन पीएचसी बाबत निर्णय घेतला जाईल.-डॉ. रामदास मराड, पालघर जिल्हा शल्य चिकित्सक