डहाणू (पालघर) : विरेंद्र खाटा
डहाणू नगरपरिषदेतील १३ प्रभागांत २७नगरसेवक आणि १ नगराध्यक्ष पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत डहाणूत मोठी चुरस निर्माण झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी २ आणि नगरसेवक पदांसाठी तब्बल ६५ उमेदवार रिंगणात उतरले असून निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (शरद पवार) गट आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गट यांच्यात प्रमुख लढत रंगणार असून डहाणूत दुरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
थेट जनतेतून होणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे माजी नगराध्यक्ष भरत राजपूत आणि शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र (राजू) माच्छी आमनेसामने आहेत. माच्छी यांच्या प्रच-ारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर भरत राजपूत यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डहाणूत दाखल झाले होते. या दोन्ही सभांना मोठ्या प्रमाणावर पक्ष कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी डहाणूच्या विकासाच्या मुद्द्यावर दोन्ही बाजूंनी भर देण्यात आला. दरम्यान, उबाठा व माकपचे उमेदवारही काही प्रभागात स्वतंत्रपणे नगरसेवक पदासाठी रिंगणात आहेत.
निवडणूक प्रचार सोमवारी थंडावणार असला तरी शनिवार, रविवार या दोन दिवसांत प्रमुख पक्षांनी संपूर्ण ताकद झोकून देत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. भाजप, शिव सेना (शिंदे गट) राष्ट्रवादी (शरद पवार) गट आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गट यांच्या रॅल्या राजकीय वातावरण अधिकच तापवणाऱ्या ठरल्या. शनिवारी संध्याकाळी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या रॅलींना मोठा प्रतिसाद मिळाला. तर रविवारी भाजपने काढलेल्या भव्य शक्तिप्रदर्शन रॅलीनंतर दोन्ही बाजूंमध्ये स्पर्धा शिगेला पोहोचल्याचे स्पष्टपणे जाणवले. रामवाडी येथील भाजपा कार्यालयातून ही रॅली सकाळी ११ वाजता सुरू झाली. रामवाडी, सागरनाका, मसोलीनाका, पारनाका, आगर, इराणी रोड, स्टेशन रोड अशा प्रमुख मार्गावरून निघालेल्या रॅलीत मोटारसायकलींचा प्रचंड ताफा, चारचाकी वाहनांच्या रांगा आणि घो षणाबाजीमुळे वातावरण अक्षरशः उत्साही झालं होतं.
भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या कार्यालयाजवळ सकाळपासूनच कार्यकर्त्यांचा ओघ वाढला होता. मोठ्या गर्दीमुळे रामवाडी, पटेलपाडा, एन्ट्रीगेट परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली; परंतु पोलिसांनी तत्काळ उपाययोजना करून वाहतूक सुरळीत केली. प्रचाराचा शेवटचा दुसरा दिवस असल्याने भाजपच्या शक्तिप्रदर्शनात उत्साह ओसंडून वाहताना दिसला.
एकूणच, दोन्ही प्रमुख पक्षांनी कोणत्याही बाबतीत कमी न पडता निवडणुकीत झोकून दिल्याने डहाणूची निवडणूक अधिकच चुरशीची ठरणार आहे. भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (शरद पवार) गट आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गट यांच्यातील थेट सामना आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे.
येणाऱ्या निकालानंतर सत्ता कोणाच्या हाती जाणार, नगरपरिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार आणि विजयानंतरची रॅली कोण काढणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. निकालापूर्वीच डहाणूतील राजकीय वातावरण तापले असून अंतिम लढत अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.