Dahanu Mahalaxmi Yatra Pudhari
पालघर

Dahanu Mahalaxmi Yatra: डहाणूतील महालक्ष्मी यात्रेला भाविकांची प्रचंड गर्दी; महामार्गावर वाहनांच्या लाबाचं लांब रांगा

यात्रेच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षेपेक्षा कमी भाविक आल्याने व्यापारी व दुकानदारांमध्ये चिंतेचे वातावरण होते.

पुढारी वृत्तसेवा

कासा: पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध डहाणू येथील महालक्ष्मी मातेच्या यात्रेला हनुमान जयंतीपासून उत्साहात सुरुवात झाली असून, दुसऱ्या होम-हवनानंतर यात्रेला भाविकांची अक्षरशः तुफान गर्दी उसळली आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुलनेने मंदावलेली यात्रा शनिवार-रविवारी पुन्हा रंगात आली.

यात्रेच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षेपेक्षा कमी भाविक आल्याने व्यापारी व दुकानदारांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र दुसरा होम-हवन पार पडताच यात्रेकरूंची संख्या झपाट्याने वाढली. शनिवार व रविवार सुट्टीचा फायदा घेत पालघर, डहाणू, वाडा, जव्हार, मोखाडा, ठाणे, मुंबई तसेच गुजरातमधील दमण, दीव व सिल्वासा भागांतून मोठ्या संख्येने भाविकांनी यात्रेला हजेरी लावली.

यामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सायंकाळपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. घोळ टोलनाक्यापासून महालक्ष्मी मंदिरापर्यंत सुमारे 5 ते 6 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ही कोंडी रात्री 1 वाजेपर्यंत कायम होती.

वाहतूक कोंडीमुळे अनेक यात्रेकरूंना मनस्ताप सहन करावा लागला. काही भाविकांनी वाहन जिथं जागा भेटेल तिथे तसेच पर्यायी रस्ता चा वापर करून यात्रेपर्यंत पोहचले तर काही यात्रेकरू तब्बल 5 किलोमीटरपर्यंत पायपीट करत मंदिर गाठले. वाढती वाहनसंख्या आणि अपुरी पार्किंग व्यवस्था यामुळे कोंडीची समस्या अधिक तीव्र झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलीस चारोटी, कासा पोलीस ठाणे तसेच विशेष यात्रा बंदोबस्तातील पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. स्थानिक नागरिकांनीही यात सहकार्य केले.दरम्यान, यात्रेला वाढलेली गर्दी पाहता व्यापारी व दुकानदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मागील काही दिवसांपासून मंदावलेल्या व्यवसायाला पुन्हा गती मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. ही यात्रा 17 एप्रिलपर्यंत सुरू राहणार असून, पुढील काही दिवसांत शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर भाविकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान डहाणू तालुक्यातील चारोटी जवळ मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत विवळवेढे येथे श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे. हे जागृत देवस्थान मानले जात असून ही देवी नवसाला पावते असा लाखो भाविकांचा विश्वास आहे. ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्यातील भाविकांबरोबर गुजरात मधील भाविक येथे मोठ्या प्रमाणात येतात. सुरत मधील भाविकांचीही या देवीवर विशेष श्रद्धा आहे.

2 एप्रिल पासून यात्रेला सुरुवात झाली असून पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी भाविकांना सोयीसुविधा व सुरक्षिततेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. वर्षभरात या देवीचे बारसी, नवरात्र, यात्रा आदी निरनिराळे उत्सव होतात. चैत्र महिन्याच्या पौर्णिमेपासून पंधरा दिवसाची यात्रा भरते हे येथील मुख्य आकर्षण असून यात्रेत ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्यातून व गुजरात राज्यातून लाखो भाविक येतात पालघर जिल्ह्यातील ही सर्वात मोठी यात्रा आहे.महालक्ष्मी मातेच्या अनेक आख्यायिका आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT