डहाणूतील महालक्ष्मी गडावर दरड कोसळली pudhari photo
पालघर

Landslide in Dahanu : डहाणूतील महालक्ष्मी गडावर दरड कोसळली

सात दुकानांचे नुकसान, तीन दुकाने दरीत कोसळली; गडावर न जाण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

डहाणू : डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी गडावर शनिवार, 16 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसामुळे दरड कोसळून एकूण सात दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यापैकी तीन दुकाने थेट दरीत कोसळली असून, सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. महालक्ष्मी गडाच्या सुळक्यावरून घसरलेली दरड थेट मंदिर परिसरातील दुकानांवर आली. दरडीसह तीन दुकाने दरीत कोसळल्यामुळे मंदिर परिसरातील अरुंद रस्ताही बाधित झाला आहे. मात्र पावसामुळे मंदिरात भाविकांची वर्दळ कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली.

गेल्या काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र दोन दिवसांपासून पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. रानशेतकडील उंच सुळक्याच्या बाजूने ओलसर माती व खडक घसरून दरड कोसळली. यामुळे गडावरील काशिनाथ घोषे, वालू घोषे, अशोक घोषे, अमृत सालकर यांसह अनेक दुकानदारांचे शेड, मालसाठा आणि फर्निचरचे नुकसान झाले.

गेल्या काही वर्षांपासून महालक्ष्मी गडावर अशा प्रकारे दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. 2022 सालीही गडावर मोठी दरड कोसळली होती. त्यावेळी तीन दुकाने बाधित झाली होती. पावसाळा, सणासुदीचे दिवस व सुट्ट्यांच्या दिवशी गडावर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. त्यामुळे अशा वेळी दरड कोसळल्यास मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गडावर वारंवार दरड कोसळत असल्याने भविष्यातील धोका टाळण्यासाठी महालक्ष्मी गडाच्या सुळक्यावर संरक्षण जाळी लावण्याची गरज स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

रस्त्याच्या कडेला सुरक्षा जाळी बसवावी

श्रावण महिन्यात महालक्ष्मी गडावर सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी असते. पालघर, डहाणू, गुजरातसह आसपासच्या भागातून भाविक पायी किंवा वाहनाने गडावर येतात. मात्र गडावरील चढाईचा रस्ता अरुंद आणि वळणावळणाचा असल्याने अपघात किंवा आपत्कालीन प्रसंगी अडचणी निर्माण होतात. या दुर्घटनेनंतर ग्रामस्थ व भाविकांनी गडावरील रस्त्याच्या कडेला सुरक्षा जाळी बसवावी, अशी मागणी केली आहे.

भाविकांना विनंती करण्यात येते की महालक्ष्मी मंदिर गडावर दरड कोसळली आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. गडावर दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांनी तसेच पर्यटनासाठी येणार्‍या पर्यटकांनी काही दिवस गडावर जाणे टाळावे. पाऊस कमी झाल्यावर गडावर आवश्यक उपाययोजना करण्यात येतील.
किरण पवार, पोलिस निरीक्षक, डहाणू पोलीस ठाणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT