डहाणू बोर्डी किनाऱ्यावर ७ डिसेंबरला ऐतिहासिक भव्य मॅरेथॉन  pudhari photo
पालघर

Dahanu Bordi Beach Marathon 2025 : डहाणू बोर्डी किनाऱ्यावर ७ डिसेंबरला ऐतिहासिक भव्य मॅरेथॉन

महास्वच्छता अभियानही होणार; गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा संकल्प; १० हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग राहणार

पुढारी वृत्तसेवा

पालघर : पालघर जिल्ह्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या डहाणू बोर्डी समुद्र किनाऱ्यावर ७ डिसेंबर रोजी ऐतिहासिक भव्य बीच मॅरेथॉन स्पर्धा आणि महास्वच्छता अभियान असा संयुक्त कार्यक्रम आऊट प्ले स्पोर्ट्स फाउंडेशन आणि मीडिया पार्टनर दैनिक पुढारी यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. डहाणू बोर्डी बिच मॅरेथॉन आणि 'डहाणू बोर्डी बिच क्लीन अप ड्राईव्ह' २०२५ असे या कार्यक्रमाचे नाव आहे. गिनेज वर्ल्ड रेकॉर्ड होईल असा हा उपक्रम असून १८ किलोमीटरच्या भव्य किनारपट्टीवर सर्वाधिक प्लास्टिक कचरा जो साचलेला आहे, तो गोळा करण्याचा उपक्रमही यात सामाविष्ट आहे.

या भव्य बीच मॅरेथॉनमध्ये ३ हजार धावपटू, ८ हजार स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. शाळा, महाविद्यालयांचे एनसीसी एनएसएसचे विद्यार्थी स्थानिक ग्रामस्थ, स्थानिक मच्छीमार व्यावसायिक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पर्यावरण रक्षण करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी होतील. धावपटूंसाठी ५ किमी-वेव्ह रन. टॅगलाईन : प्रत्येक लाट बदल घडवते. २. १० कि. मी. मॅग्रोव्ह रन. ३.२१ किमी ब्लू प्लॅनेट हाफ मॅरेथॉन टॅगलाईन : स्वच्छ, हिरव्या पृथ्वीसाठी धावा अशा तीन विभागात ही स्पर्धा घेतली जाईल.

समुद्र किनारपट्टीवरील १८ किलोमीटरचा हा सागरी बीच दहा झोनमध्ये विभागून प्रत्येक झोनमध्ये स्वयंसेवकांच्या पथकांची नेमणूक केली जाणार आहे. प्लास्टिक आणि समुद्र पाण्यातून वाहून येणाऱ्या कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण आणि त्याचे वजन या सर्व कामगिरीचे डॉक्युमेंटेशन केले जाणार आहे. गिनेज वर्ल्ड रेकॉर्डच्या मार्गदर्शक तत्वानुसार ही मोहीम राबवली जाईल. सुमारे अडीच ते तीन टन प्लास्टिक कचरा एका दिवसात संकलित करण्याचे लक्ष्य या मोहिमेत ठेवण्यात आले आहे.

आऊट प्ले स्पोर्ट फाउंडेशन ही संस्था अनेक वर्षे पर्यावरण संवर्धनाचे काम करत आहे. तसेच क्रीडा विषयक कार्यक्रमात सहभाग घेत आहे. युवकांच्या सहभागातून अनेक सामाजिक उपक्रम राबविणारी ही संस्था अग्रणी संस्था म्हणून ओळखली जाते. 'बी अ गार्डिनिय अप नेचर' (निसर्गरक्षक) या संकल्पनेतून डहाणू बोर्डी किनाऱ्याच्या संवर्धनासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला असून पर्यटन प्रेमींसाठी हा महत्वाचा टप्पा असणार आहे. जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा पोलीस विभाग, स्थानिक संस्था, शाळा महाविद्यालय आणि विविध संघटनांचा यात सक्रिय सहभाग असणार आहे.

कोकण किनारपट्टीवर सागरी जीव बचाव उपक्रम अनेक वर्ष राबविले जातात. समुद्री कासवे यासह अनेक समुद्री जीव किनारपट्टीवर येणारे परदेशी पक्षी किनारपट्टीवरील जैवविविधता याचे रक्षण आणि संवर्धन करण्याचा हा उपक्रम आहे. जैव विविधतेला प्लास्टिक कचऱ्याचा धोका वाढत असल्याची जाणीव नागरिकांना करून देणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेतून गोळा झालेला कचरा प्रक्रिया करण्यासाठी अधिकृत संस्थांकडे दिला जाणार आहे. नोंदणीसाठी टाउन स्क्रीप्ट लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे.

जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांसाठी व युवकांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी, प्रोत्साहन देणारा असेल. त्यामुळे सर्व युवावर्गाला यात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. पर्यावरणाचे संरक्षण व्हावे, स्थानिक व येणाऱ्या पर्यटकांना आरोग्यदायी जीवनशैली जगता यावी, स्वच्छ किनारे अनुभवता यावेत व डहाणू बोर्डी परिसर स्वच्छ सुंदर व्हावा या उद्देशाने हा उपक्रम होणार असून राज्यात हा उपक्रम लक्षवेधी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

७ डिसेंबर रोजी डहाणू बोर्डी बिच मॅरेथॉन या ऐतिहासिक उपक्रमासाठी सर्व एकत्र येत असून यानिमित्ताने बोर्डी बिच मॅरेथॉन तसेच भव्य बिच क्लीन अप ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे आपण धावण्याचाच नाही तर बिच संवर्धनाचाही उपक्रम हाती घेतलेला आहे. यानिमित्ताने गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचाही उद्देश आहे. सर्व नागरिक, विद्यार्थी, एनएनएसच्या विद्यार्थ्यांनी या बीच मॅरेथॉनमध्ये नोंदणी करावी, सहभागी व्हावे. गार्डियन्स ऑफ नेचर म्हणून काम करावे जेणेकरून हा बीच स्वच्छ, सुंदर व प्रदूषणमुक्त होईल.
इंदूराणी जाखड, जिल्हाधिकारी, पालघर
मी सर्वांना विनंती करतो की, बोर्डी येथे होणाऱ्या भव्य मॅरेथॉन आणि महास्वच्छता मोहीम २०२५ मध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे. एनसीसीच्या सर्व विद्यार्थ्यांनाही मी आवाहन करतो की तुम्ही या. राष्ट्रीय स्वच्छतेच्या कामामध्ये सहभागी व्हा.
विवेक त्यागी, मेजर जनरल, एडीजी, एनसीसी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT