चंद्रसागर खाडीत तीन वर्षांनंतर पुन्हा चित्रबलक पक्षी विहार करताना दिसताहेत. Pudhari News Network
पालघर

Dahanu Birds : डहाणूत तीन वर्षांनंतर पुन्हा दिसले चित्रबलक पक्षी

चंद्रसागर खाडीत पक्षी विहार

पुढारी वृत्तसेवा

डहाणू (पालघर): डहाणूच्या चंद्रसागर खाडीत तीन वर्षानंतर पुन्हा चित्रबलक किंवा चामढोक (पेंटेड स्टॉर्क) या करकोचा जातीचे पक्षी विहार करताना दिसताहेत. या खाडीत भरान टाकल्याने पाणथळ पक्ष्यांनी पाठ फिरवल्याने कांदळवन आणि जैवविविधतेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याबाबत सजग महिलेने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळून भराव हटवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी खाडी भरावमुक्त करण्यात आली. चंद्रसागर खाडीतील सरकारी जमिनीवर लगतच्या जमीन मालकांनी मातीचा भराव करून मोठे बांध बांधले होते.

खाडीतील जैवविविधता तसेच कांदळवनाच्या नुकसानाची दखल संवेदनशील नागरिक संगीता मंगळ्या कडू यांनी घेतली. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात २०२३ साली याचिका दाखल केली. ३ एप्रिल २०२५ रोजी उच्च न्यायालयाने रिट याचिका निकाली काढून सीआरझेडचे उल्लंघन करून जमिनीवर बेकायदा भराव घालण्यासह खारफुटीचे नुकसान करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश पालघर जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. न्यायालयात अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश देत, ९ जून रोजीच्या आदेशानुसार सहा आठवड्यांत परिस्थिती पूर्ववत करण्याचे म्हटले होते.

परिसंस्थेला पोषक वातावरण

जून आणि जुलै महिन्यांत नऊ ठिकाणी बांध फोडून पूर्वस्थिती निर्माण करण्यात आल्याचा अहवाल न्यायालयाला पाठविला. खाडीतील परिसंस्थेला पोषक वातावरण निर्माण झाल्यानेच पक्षी पुन्हा अवतरलेत. अन्य जातींचे पक्षी असण्याची शक्यता असून, ही घटना पक्षी निरीक्षकांसाठी शुभवर्तमान ठरली आहे. वाइल्ड केअर स्वयंसेवक सागर पटेल व छायाचित्रकार समीर भालेरकर यांनी या दुर्मिळ पक्ष्यांची छायाचित्र टिपली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT