प्रातिनिधिक छायाचित्र  (file photo)
पालघर

Illegal gutkha trade : गुटखा पकडण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या पोलिसाला बदलीची बक्षिशी

पोलीस अधीक्षकांकडून प्रशस्तीपत्राऐवजी मिळाले बदलीचे पत्र

पुढारी वृत्तसेवा

पालघर : जीव धोक्यात घालून गुटखा माफियांना रोखणार्‍या मनोर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदारावर बदलीची कारवाई करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गुटखा माफियांविरोधात कारवाई करणार्‍या अंमलदाराला जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून प्रशस्तीपत्र मिळण्याऐवजी बदलीचे पत्र देण्यात आहे. बदलीच्या कारवाईमुळे गुटखा माफियांचे कंबरडे मोडण्यासाठी पुढे असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांना मनोबल खच्ची झाल्याचे बोलले जात आहे.

मनोर पोलिसांच्या पथकाने 11 जून 2025 रोजी वरई पारगाव रस्त्यावर सापळा रचून केलेल्या कारवाईत गुटखा वाहतूक करणार्‍या दोन कार तसेच दोन लाख 35 हजार रुपयांचा गुटखा हस्तगत केला होता.डिटेक्शन शाखेच्या कर्मचार्‍यांनी निर्माणाधीन मुंबई बडोदा दृतगती महामार्गावरून छूप्या पद्धतीने सुरु असलेली गुटखा वाहतूक रोखली होती तसेच गुटखा माफ्यिांनी गुटखा वाहतूकीसाठी शोधलेला नवीन मार्ग उघडकीस आणला होता.

कारवाईदरम्यान गुटखा माफियांनी कर्तव्यावर असलेल्या पोलीस अंमलदारावर भरधाव वेगातील कार घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु प्रसंगावधान राखत साकव पुलावरून खाली उडी मारल्याने बचावले होते. साकव पुलावरून दहा ते पंधरा फूट खाली पडल्याने जखमी होऊन त्यांना दुखापत झाली होती.

गुटखा माफियां विरोधात उघडलेल्या मोहिमेत मनोर पोलीस ठाण्याची डिटेक्शन शाखा आणि गोपनीय शाखेच्या कर्मचार्‍यांकडून यशस्वी कारवाया करण्यात आल्या होत्या. महिन्याभरात केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये लाखो रुपयांचा गुटख्याचा साठा आणि वाहने जप्त करून गुटखा माफियांना जेरीस आणले आहे.मनोर परिसरातील गल्ली बोळात गुटखा उपलब्ध करून देणार्‍या गुटखा माफियांचे कंबरडे मोडण्यात यश आले होते.

गुटखा वाहतूक आणि साठवणुकी विरोधात पोलिसांच्या कारवायांचे सर्वसामान्य जनतेकडून स्वागत केले जात असताना गुटखा माफियां विरोधात षड्डू ठोकणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाईची कुर्‍हाड चालवल्याने अंमलदारांचे मनोबल खच्ची झाले आहे. मनोर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांच्या गोपनीय माहितीनूसार पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी डिटेक्शन ब्रांचच्या पोलीस अंमलदाराच्या बदलीचे आदेश काढले आहेत.

गुन्ह्यात अटक आरोपी सागर पाटील याचा भाऊ प्रथमेश पाटील आणि भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी येथील त्याचा साथीदार विकी याचे नाव गुन्ह्यात घेण्यात आले नाही. तसेच गुन्हा दाखल होऊन एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी पूर्ण झाला असताना तपास अधिकार्‍यांकडून उर्वरित आरोपी तसेच गुन्ह्यात पाहिजे असलेली सफारी कार जप्त करण्यात आलेली नाही. त्यामुळे मनोर पोलिस तसेच तपास अधिकार्‍यांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे.

गोपनीय माहिती नुसार पोलीस अंमलदाराची बदली करण्यात आली आहे.गुन्ह्यात सहभाग असलेल्या आरोपीना अटक करण्याचे निर्देश पोलीस ठाणे प्रभारींना देण्यात आले आहेत.
यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT