कंत्राटी शिक्षकांचे पालघर जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन pudhari photo
पालघर

Contract Teachers Protest : कंत्राटी शिक्षकांचे पालघर जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन

मागण्या मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

पालघर शहर : कंत्राटी शिक्षकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी पालघर जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी जिल्हा परिषद कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. यावेळी अडीचशेहून अधिक कंत्राटी शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले व मागण्या मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

मानधन तत्त्वावरील कंत्राटी शिक्षक पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्त असून अध्यापनाची सेवा बजावत असून नियमित शिक्षकांप्रमाणे अध्यापनाबरोबरच शालेय प्रशासकीय कामकाज, विविध शैक्षणिक योजना, ऑनलाइन काम, परीक्षा व इतर उपक्रम प्रमाणिकपणे पार पाडत आहेत. कंत्राटी शिक्षक हे अध्यापन व इतर सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असताना देखील त्यांना मूलभूत हक्क, अर्थिक सुरक्षितता व सेवाशर्ती लाभ मिळत नसल्याचे कंत्राटी शिक्षकांचे म्हणणे आहे.

पालघर जिल्ह्यातील मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी जागा आरक्षित ठेवण्यात याव्यात, नियुक्त केलेल्या शिक्षकांच्या जागा पवित्र पोर्टलला रिक्त दाखवू नयेत, सदर जागा मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने कार्यरत शिक्षकांमधून भरण्यात याव्यात. मानधन तत्वावरील कंत्राटी शिक्षकांचे शासनाने विहित केलेल्या पात्रतेचे निकष पूर्ण असल्याने शिक्षणसेवक म्हणून नियुक्त्या देण्यात याव्यात.

जिल्हा परिषद पालघर अंतर्गत मानधन तत्त्वावरील कंत्राटी पद्धतीने नियुक्ती आदेश असलेल्या शिक्षकांना 11 फेबु्रवारी 2026 शासन निर्णयानुसार पेसा क्षेत्रातील रिक्त पदासाठी प्राधान्याने नियमित नियुक्ती देण्यात यावी. पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवताना पदभरतीसाठी यापूर्वी जाहिरातीद्वारे राबविलेल्या निवड प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या निवड यादीतील उमेदवारांच्या, तसेच दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती दिलेल्या उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार नियुक्तीची कार्यवाही करण्यात यावी व त्यानंतर उर्वरित रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू करावी, आदी मागण्यासाठी कंत्राटी शिक्षकांनी पालघर जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT