Monsoon Planning Pudhari
पालघर

Monsoon Planning: नवनियुक्त आयुक्तांचा शहरातील नाले,सखल भागांचा पाहणी दौरा

जलनिस्सारण व्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी कडक निर्देश

पुढारी वृत्तसेवा

वसई: येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील जलनिस्सारण व्यवस्था सक्षम राहावी व पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी गुरुवारी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रमुख नाले व सखल भागांची पाहणी केली. या वेळी संबंधित विभागांना आवश्यक त्या उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

पावसाळ्यात शहरातील विविध भागांमध्ये पाणी साचण्याच्या समस्या उद्भवू नयेत, तसेच नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आयुक्तांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन जलनिस्सारण व्यवस्थेचा आढावा घेतला.

शहरातील प्रमुख नाले, गटारे, पाण्याचा निचरा होणारी ठिकाणे तसेच दरवर्षी पाणी साचण्याची शक्यता असलेले सखल भाग यांची तपासणी करण्यात आली. यावेळी नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे निर्धारित वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, तसेच पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची स्वच्छता सुनिश्चित करावी, अशा स्पष्ट सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

नाल्यांमधील अडथळे दूर करण्याची प्रक्रिया व स्वच्छता मोहिमेची प्रगती याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. तसेच सखल भागांमध्ये पाणी साचू नये यासाठी अतिरिक्त पंपिंग यंत्रणा तयार ठेवण्याचे, आपत्कालीन परिस्थितीसाठी नियंत्रण कक्ष सक्रिय ठेवण्याचे तसेच आवश्यक मनुष्यबळ व साधनसामग्री उपलब्ध ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.

या पाहणी दौऱ्याची सुरुवात महानगरपालिका मुख्यालय शेजारील नाल्यापासून करण्यात आली. त्यानंतर विरार पश्चिम येथील रेल्वे कल्वर्ट क्र.83, म्हाडा इमारत क्र.14 कल्वर्ट, बोळींज-खारोडी रस्ता कल्वर्ट, गोकुळ टाऊनशिप येथील विनय युनिक कल्वर्ट, रानपाडा गाव, आगाशी पुरापाडा स्मशानभूमी कल्वर्ट, युनिटेक कॉम्प्लेक्स, जुने विवा कॉलेज परिसर, नारंगी गाव रेती बंदर, मारंबळ पाडा मार्गे चिखलडोंगरी खाडी, आचोळे येथील द्वारका हॉटेल परिसर, गोखीवरे येथील मधुबन कॉम्प्लेक्स, राजावली पुलाजवळील नाला, गोगटे सॉल्ट परिसर तसेच ओमनगर येथील सखल भागांची पाहणी करण्यात आली.

या दौऱ्यावेळी अतिरिक्त आयुक्त (दक्षिण) संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त (उत्तर) दीपक सावंत, उपआयुक्त, प्रभारी शहर अभियंता, प्रभाग सहाय्यक आयुक्त, अभियंते, आरोग्य निरीक्षक व संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, महानगरपालिकेच्या सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून पावसाळ्यात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन पालिका आयुक्तांनी केले. तसेच नागरिकांनी नाल्यांमध्ये कचरा टाकू नये, परिसरात स्वच्छता राखावी व महानगरपालिकेच्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT