डहाणू : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात येत्या काही दिवसांत वातावरण बदलणार असून काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ३१ मार्च रोजी जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच, १ आणि २ एप्रिल रोजीही वातावरण अंशतः ढगाळ राहील आणि काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान अंदाजानुसार ३१ मार्च रोजी वाऱ्याचा वेग ३० ते ४० किलोमीटर प्रतितास राहण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह काही भागांत पाऊस पडू शकतो. याशिवाय, कमाल आणि किमान तापमानात थोडीशी वाढ होण्याची शक्यताअसून कमाल तापमान सरासरी ३५ ते ३६ अंश सेल्सियस आणि किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सियस दरम्यान राहू शकते. पावसाचा अंदाज लक्षात घेता जिल्हा कृषि हवामान केंद्र आणि कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, पालघर यांनी शेतकऱ्यांना सतर्कतेचा सल्ला दिला आहे. परिपक्व फळे आणि भाजीपाला वेळेत काढून घ्यावेत तसेच धान्य व जनावरांचा चारा सुरक्षित ठिकाणी साठवावा.