Census Duty File Photo
पालघर

Census Duty: जनगणना कामात अडथळा, प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई

पालघर नगर परिषदेच्या 46 कर्मचाऱ्यांवर गुन्हे

पुढारी वृत्तसेवा

पालघर शहर: जनगणना 2027 च्या अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय कामात जाणीवपूर्वक टाळाटाळ करणाऱ्या आणि प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्या 46 कर्मचाऱ्यांविरुद्ध पालघर नगरपरिषदेने कारवाईचा बडगा उगारला आहे. सूचना देऊनही कर्तव्यात कसुरी करणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर जनगणना अधिनियम 1948 व 1990 च्या विविध कलमान्वये पालघर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांच्या या धडक कारवाईमुळे कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पालघर नगरपरिषद क्षेत्रात आगामी जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या अंतर्गत घरयादी आणि घरगणना करण्यासाठी शहरभरात एकूण 196 प्रगणकांची आवश्यकता होती.

यासाठी स्थानिक शिक्षक, बीएलओ आणि इतर सरकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांसाठी 24 एप्रिल ते 9 मे 2026 या कालावधीत विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणास 150 कर्मचारी उपस्थित राहिले, मात्र उर्वरित 46 कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाकडे पाठ फिरवली.

या कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत वारंवार दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला, मेसेज पाठवले गेले आणि लेखी नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र, इतकी पूर्वसूचना देऊनही या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय कर्तव्यापेक्षा स्वतःच्या सोयीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. जनगणना हे केवळ सांख्यिकी काम नसून ते देशाच्या नियोजनासाठीचे सर्वोच्च महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य आहे.

कर्मचारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचे पाहून मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी कठोर पाऊल उचलले. या कर्मचाऱ्यांविरोधात रोजी पालघर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आले असल्याचे प्रशांत जाधव यांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT