तलासरी : तलासरी: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी तलासरी तालुक्यातील झरी येथे उभारलेले कंत्राटदार कंपनीचे गोडाऊन (कास्टिंग याड) वादाच्या भोवर्यात सापडले आहे. हे गोदाम ज्या जमिनीवर उभे आहे, तिचा वापर बेकायदेशीर असल्याचा आरोप स्थानिक आदिवासी खातेदारांनी केला आहे. या प्रकरणी प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याने आदिवासी खातेदारांनी 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
झरी गावातील सामाईक’गोळा प्लॉट’ प्रकारातील जमिनीमध्ये आदिवासी आणि बिगर-आदिवासी असे दोन्ही प्रकारचे खातेदार आहेत. बिगर-आदिवासी खातेदारांनी ही जमीन बुलेट ट्रेनचे काम करणार्या कंपनीला गोदामासाठी परस्पर भाड्याने दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. शिवाय ही जमीन अद्याप अकृषिक झालेली नाही. असे असतानाही तिचा व्यावसायिक वापर सुरू करण्यात आल्याने शासकीय नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप आदिवासी खातेदारांनी केला आहे.
या प्रकरणी आदिवासी खातेदारांनी तहसीलदार, सहाय्यक जिल्हाधिकारी आणि पालघरच्या जिल्हाधिकार्यांकडे तक्रारी केल्या आहेत. खा. हेमंत सवरा यांनीही या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. ठोस कार्यवाही होत नसल्यामुळे खातेदारांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर तहसीलदारांनी संबंधित खातेदारांना जागेचे दस्तऐवज सादर करण्याची सूचना दिली आहे.