पालघर : हनिफ शेख
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामानिमित्ताने करण्यात येणार्या स्फोटामुळे जलसार गावातील अनेक घरांचे पाया खचले आहेत. घरांना तडे ही गेले आहेत. या बाधित नागरिकांना योग्य ती नुकसान भरपाई न दिल्यास बुलेट ट्रेनच्या बोगद्यासमोरच आंदोलन करण्याच्या इशारा मेघराज मित्र मंडळाचे तेजस पाटील यांनी दिला आहे. यामुळे श्रीमंतांसाठीचा प्रकल्प गरिबांच्या मात्र मुळावर आल्याचे यातून दिसून येत आहे. यामुळे सरकार तुमची बुलेट ट्रेन लोकांच्या घरावरून जाणार का असाही उपरोधिक सवाल आता विचारला जात आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामानिमित्ताने जलसार येथे असलेल्या मेघराज या पाचशे वर्षे जुन्या देवस्थान असलेल्या डोंगराला बोगदा खोदण्याचे बुलेट ट्रेनच्या मार्गाचे काम सुरू आहे. या कामानिमित्ताने एल अँड टी कंपनीकडून स्फोट घडवून काम सुरू आहे. मात्र हे स्फोट करताना आजूबाजूच्या गावातील लोकांना विश्वासात घेऊन त्याची कल्पना देणे आवश्यक असताना त्यांनी तसे न करता हे स्फोट सुरूच ठेवले त्यामुळे घरांना भिंतीवर भेगा पडल्या तसेच घरांचे पाया कमकुवत झाले. त्यामुळे त्या घराचे आयुष्य कमी झाली आहे. फक्त घरांना भेगा पडल्या त्याचेच जर नुकसान भरपाई देणार असतील तर त्याला काही अर्थ नाही या घरांच्या पाया जर कमकुवत झाला आहे. तर ते घर किती दिवस व्यवस्थित उभे राहू शकेल.
ज्या ज्या गोष्टीचं नुकसान झाले आहे. त्याच्या हिशोबाने नुकसान भरपाई द्यावी किंवा त्यांना त्या पद्धतीने घर बांधून द्यावे अशीही मागणी पुढे येत आहे. जिल्हाधिकारी यांनी या प्रश्नावर बैठक घेतली होती.त्यामध्ये गावानजीक होणार्या स्फोटामुळे घरे हादरत असून घराच्या भिंतींना व पायाला तडे गेल्याने घरे धोकादायक झाली आहेत. हा विषय चर्चिला गेला होता. आम्ही विकासाच्या विरोधात नसून आमच्या घराच्या आणि मालमत्तेचे होणारे नुकसान ची आम्हाला पूर्ण भरपाई मिळावी अशी मागणी उपस्थित ग्रामस्थांनी केली आहे.
या मागणीवरून जिल्हाधिकार्यांनी पूर्णता भरपाई मिळणे शक्य नसले तरी थर्ड पार्टी सर्वेक्षण करून त्यांनी सादर अहवालानुसार नुकसान भरपाई दिली जाईल असे जाहीर केले. जर मोबदला आम्हाला योग्य वाटला नाही तर मेघराज मित्र मंडळाच्या वतीने आंदोलन केले जाईल.असा इशारा मंडळाचे अध्यक्ष पाटील यांनी दिला आहे.