Bomb Threat Mail : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ईमेल, प्रशासनाची धावपळ, बॉम्ब विरोधी पथक दाखल, तपासणी सुरू File Photo
पालघर

Bomb Threat Mail : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ईमेल, प्रशासनाची धावपळ, बॉम्ब विरोधी पथक दाखल, तपासणी सुरू

कोळगाव येथील जिल्हा मुख्यालय संकुलातील इमारती तातडीने रिकाम्या केल्या, सुरक्षा यंत्रणा तैनात

पुढारी वृत्तसेवा

Bomb threat Mail at Palghar Collectorate office

पालघर : बाबासाहेब गुंजाळ

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात आज (मंगळवार) २० मे रोजी सकाळी बॉम्ब असल्याचा ईमेल प्राप्त झाला आहे. अज्ञात व्यक्तीकडून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवला असून तो दुपारी साडेचार च्या सुमारास फुटणार असल्याची प्राथमिक माहिती दिली गेली आहे.

जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून मुख्यालय परिसरातील सर्व इमारती खाली केल्या आहेत. पोलीस बॉम्ब विरोधी पथक व एन डी आर एफ यांनी इमारतीचा ताबा घेतला असून बॉम्ब नक्की कुठे ठेवला आहे याची कसून तपासणी सुरू आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील जिल्हाधिकारी तसेच सर्व उच्च पोलीस व महसूल अधिकारी उपस्थित राहून योग्य ती काळजी घेत आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी कार्यालय सुरू झाल्यानंतर आलेल्या एका मेल अकाऊंट पडताळणी करत असताना जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवलेला असून तो दुपारी साडेतीन ते साडेचार वाजण्याच्या दरम्यान फुटणार असल्याची माहिती त्या मेलमध्ये दिली होती.

जिल्हा प्रशासनाने या सदर ईमेलची चौकशी करण्याकरता सायबर पोलीस यांना कळवले असता या ईमेल बाबत सत्यता पडताळल्यानंतर कुठलीही जोखीम न पत्करता तात्काळ जिल्हाधिकारी मुख्यालय, जिल्हाधिकारी इमारत, प्रशासकीय अ व ब दोन्ही इमारतीमधील सर्व कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी व त्या ठिकाणी आलेली सामान्य लोक यांना सुरक्षित ठिकाणी दूर उभे केले असून बॉम्ब विरोधी पथकाला इमारत तपासण्यासाठी तात्काळ पाचारण केले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग एन.डी.आर.एफ तसेच पालघर पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यात याबाबत माहिती मिळाली असता अगोदर हा माॅक ड्रिलचा भाग आहे की काय अशी शंका लोकांना येत होती. मात्र निवासी जिल्हाधिकारी सुभाष भागडे यांनी याबाबत सदर घटना सत्य असल्याची माहिती पुढारी प्रतिनिधीला दिली.

आलेला ईमेल खरा आहे की केवळ घाबरवण्यासाठी पाठवलेला आहे. कोणतीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एकीकडे खरंच बॉम्ब आहे का याचा शोध सुरू आहे. तर दुसरीकडे पालघर सायबर पोलीस दल आलेल्या ईमेल बाबत तपास सुरू केला आहे. लवकरच याबाबत सखोल माहिती दिली जाईल अशी माहिती बाळासाहेब पाटील यांनी पुढारीला दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT