Boisar Tribal Land Encroachment Pudhari
पालघर

Boisar Tribal Land Encroachment: आदिवासी संरक्षित जमिनीवरील 150 हून अधिक खोल्यांवर प्रशासनाचा हातोडा

दांडीपाडा येथे तोडक कारवाई; महसूल व पोलिसांचा बंदोबस्त

पुढारी वृत्तसेवा

बोईसर : दांडीपाडा येथील आदिवासी खातेदारांच्या संरक्षित जमिनीवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत कब्जा व बेकायदेशीर बांधकामांवर महसूल प्रशासनाने गुरुवारी (ता. 13) सकाळपासून व्यापक तोडक कारवाई केली. सुमारे दीड एकर क्षेत्रावर उभारण्यात आलेल्या अंदाजे 150 हून अधिक खोल्यांवर ही कारवाई करण्यात आली.

सदर जमीन महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 मधील कलम 36 व 36-अ तसेच महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमीन प्रत्यार्पित करणे अधिनियम, 1974 अंतर्गत संरक्षित असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. चौकशीत जमातीतर व्यक्तींनी कोणतीही वैध परवानगी न घेता कब्जा करून बांधकाम केल्याचे निष्पन्न झाले होते.

ही कारवाई तहसीलदार, पालघर यांच्या आदेशानुसार पार पडली. यावेळी 1 तहसीलदार, 2 नायब तहसीलदार, 4 मंडळ अधिकारी, 7 तलाठी व अन्य कर्मचारी उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळली, तर उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक उघड्यावर

तहसील कार्यालयाच्या निष्कर्षानुसार, संबंधित कब्जा कायद्याने अवैध ठरविण्यात आला असून जमीन मूळ आदिवासी धारकांकडे प्रत्यार्पित करण्यासाठी अतिक्रमण हटविणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार ही मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, कारवाईनंतर संबंधित ठिकाणी वास्तव्यास असलेली अनेक कुटुंबे बेघर झाली. लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक उघड्यावर आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवत कारवाई शांततेत पूर्ण केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT