संदीप जाधव
बोईसर- पालघर जिल्ह्यातील बोईसर पूर्व परिसरात मॅकडीजवळील एयू प्लाझामध्ये सुरू असलेल्या ‘निंबा स्पा’वर बोईसर पोलिसांनी दुपारी शिताफीने छापा टाकत तीन महिलांना ताब्यात घेतले असून स्पा चालक फरार झाल्याची माहिती मिळाली आहे. डमी ग्राहक पाठवून खात्री केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोईसर पूर्व भागात सुरू असलेल्या निंबा स्पामध्ये देहव्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी डमी ग्राहक पाठवला होता. डमी ग्राहकाकडून मिळालेल्या माहितीनंतर संशयाची खात्री झाल्यावर पोलिसांनी योग्य नियोजन करत अचानक छापा टाकला.
या कारवाईदरम्यान तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले असून स्पा चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
दरम्यान, यापूर्वी देखील बोईसर परिसरातील एका स्पावर पोलिसांनी अशाच प्रकारची कारवाई केली होती. त्यामुळे बेकायदेशीर व्यवसायांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या धाडीनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनीही अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.