बोईसर : संदीप जाधव
बोईसर पूर्वेकडील नागझरी, लालोंडे परिसरात स्टोन क्रशर उद्योगांमधून निघणारे सांडपाणी आणि त्यामध्ये केमिकलसदृश घटक मिसळले जात असल्याचा गंभीर प्रकार शुक्रवारी (दि. २१) सकाळी समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सूर्या नदीच्या पात्राला जोडणाऱ्या नैसर्गिक ओहोळातून पांढऱ्या रंगाचा जाड फेस वाहत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नदी, नाले आणि नैसर्गिक जलस्रोतांवर अवलंबून असलेल्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागझरी आणि लालोंडे परिसर दगडखाणी तसेच स्टोन क्रशर उद्योगांसाठी ओळखला जातो. या भागातील नैसर्गिक नाले व ओहोळांमधील पाण्याचा वापर स्थानिक महिला कपडे धुण्यासाठी, तर ग्रामस्थ आंघोळीसाठी तसेच इतर दैनंदिन गरजांसाठी करतात. त्यामुळे नैसर्गिक प्रवाहात संशयास्पद सांडपाणी मिसळत असल्याचे चित्र समोर आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शुक्रवारी सकाळी डोंगर-दऱ्यांमधून वाहत येणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात अचानक मोठ्या प्रमाणात पांढरा, जाड फेस दिसून आला. हा फेस नाल्याच्या प्रवाहाबरोबर पुढे जात असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. पाण्याचा रंग आणि त्यावरील फेस पाहता हे पाणी नेमके कोणत्या कारणामुळे दूषित झाले, याची तातडीने वैज्ञानिक पद्धतीने तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील काही स्टोन क्रशर उद्योगांमध्ये दगडापासून क्रश सँड तयार करण्याच्या प्रक्रियेत विविध रसायनांचा वापर केला जात असल्याचे सांगण्यात येते. मात्र, अशा प्रक्रियेतून निर्माण होणारे रसायनयुक्त किंवा संशयास्पद सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेशिवाय नैसर्गिक नाला अथवा ओहोळात सोडण्यास परवानगी आहे का, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
दरम्यान, या प्रकाराची माहिती तारापूर एमआयडीसीच्या पर्यावरण विभागाला देण्यात आली. त्यावेळी क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जाईल, असे सांगण्यात आले. मात्र, नागरिकांच्या आरोग्याशी आणि नैसर्गिक जलस्रोतांशी संबंधित गंभीर प्रकार समोर आलेला असताना केवळ पाहणीचे आश्वासन न देता संबंधित पाण्याचे नमुने घेऊन त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करणे, पाण्याचा उगम शोधणे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
नागझरीचे उपसरपंच सुदेश पाटील यांनीही या प्रकाराचा निषेध व्यक्त केला असून, नैसर्गिक नाल्यात अशा प्रकारचे पाणी सोडले जात असेल तर त्याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे.
ग्रामीण भागातील जलस्रोतही धोक्यात
तारापूर एमआयडीसी परिसरातील प्रदूषणाच्या प्रश्नानंतर आता निसर्गाने समृद्ध असलेल्या नागझरी, लालोंडे यांसारख्या ग्रामीण भागातील जलस्रोतही धोक्यात येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. डोंगर-दऱ्यांतून वाहणारे नैसर्गिक पाणी, ओहोळ आणि सूर्या नदी ही या परिसराची नैसर्गिक संपत्ती आहे. त्यामुळे औद्योगिक प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या सांडपाण्याची विल्हेवाट नैसर्गिक प्रवाहांमध्ये लावली जात असेल, तर त्याचा थेट परिणाम पर्यावरणाबरोबरच ग्रामस्थांच्या आरोग्यावर होऊ शकतो.
पाहणी करून पाण्याचे नमुने घ्यावेत
नाल्यात दिसून आलेला पांढरा फेस नेमका कोणत्या रसायनामुळे किंवा प्रक्रियेमुळे निर्माण झाला, याचे उत्तर अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून पाण्याचे नमुने घ्यावेत, त्यांची अधिकृत प्रयोगशाळेत तपासणी करावी आणि या पाण्याचा उगम कुठून झाला याचा शोध घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. तपासणीत दोष आढळल्यास संबंधित उद्योगांवर पर्यावरणीय नियमांनुसार कठोर कारवाई होणार का, याकडे आता नागझरी व लालोंडे परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.