रस्त्यामधील खड्ड्यांमध्ये बसून अमोल गरजे यांनी आंघोळ करत आंदोलन केले. pudhari photo
पालघर

Viral protest pothole bath: रस्त्यामधील खड्ड्यांमध्ये बसून अमोल गरजे यांनी केली आंघोळ

बोईसर-चिल्हार रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य; कोट्यवधींच्या कामाचा दर्जा पावसात उघड

पुढारी वृत्तसेवा

बोईसर : पावसाळ्याच्या सुरुवातीलाच बोईसर-चिल्हार रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. या रस्त्यावर प्रवास करताना वाहनचालक आणि प्रवाशांना चक्क जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. नागझरी नाका परिसरातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था लक्षात घेता सामाजिक कार्यकर्ते अमोल गरजे यांनी खड्ड्यांमध्ये बसून बादलीने आंघोळ करत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संतप्त प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यांच्या या अनोख्या आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

बोईसर-चिल्हार हा रस्ता तारापूर एमआयडीसीला जोडणारा एकमेव महत्त्वाचा मार्ग असून तो मुंबई-अहमदाबाद महामार्ग क्रमांक 48 ला जोडतो आहे. यारस्त्यावरील पुलाचे बांधकाम आणि रुंदीकरणासाठी साधारपणे 135 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याचे समजते. मात्र, सुरुवातीपासूनच हे काम वादग्रस्त राहिले असून, अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यावर वारंवार खड्डे पडत आहेत. या रस्त्यावर आधीच अनेक अपघात झाले आहेत. आता पावसाळा सुरू झाल्याने या स्थितीत अधिकच बिघाड होण्याची शक्यता आहे.

अमोल गरजे यांनी यापूर्वीही अनेक वेळा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी यावेळी थेट खड्ड्यात उतरून निषेध नोंदवला आहे. रस्त्यांच्या कामांमध्ये दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च होतो. मात्र खड्डे बुजत नाहीत. हा निधी खड्ड्यांमध्ये जातो की अधिकार्‍यांच्या खिशात, याचा हिशोब कोण घेणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी संबंधित अधिकार्‍यांविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणीही केली आहे.

खड्ड्यांमुळे अपघातांत वाढ होण्याची शक्यता

या रस्त्यावर दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, कामगार आणि रुग्णवाहिका प्रवास करतात. खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता वाढली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पावसाळ्यात आणखी किती लोकांचा बळी जाईल, याची कोणतीही हमी नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमआयडीसीच्या अधिकार्‍यांनी तात्काळ रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अपूर्ण कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. हा रस्ता किती गंभीर स्थितीत आहे, हे पहिल्याच पावसात उघड झालं आहे. त्यामुळे यावर्षी पावसाळा किती जीव घेईल, आणि प्रशासनाने याबाबत काय उपाययोजना केल्या आहेत, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT