विक्रमगड : हमीभाव योजनेचा लाभ मिळण्याकरिता शेतकरी नोंदणीसाठी १५ जानेवारीपर्यंत मुदत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधी सर्व्हर डाऊनचा फटका बसला तर कधी आठ-आठ दिवस केंद्रांवर हेलपाटे मारूनही नोंदणीसाठी नंबर लागलेला नाही. कोणी मुक्कामी राहन तर कोणी भल्या पहाटे नोंदणी करणाऱ्याचे घर गाठून नोंदणी केली. आताही नोंदणी सुरूच आहे.
पालघर जिल्ह्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत आदिवासी विकास महामंडळामार्फत भात खरेदी केली जात आहे. आदिवासी विकास महामंडळांतर्गत अनेक केंद्र उभारून त्याद्वारे भाताची खरेदी सुरू आहे. या केंद्रांवर भात विक्रीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागते. नोंदणी झाल्यानंतरच शेतकऱ्यांना संबंधित केंद्रांवर भाताची विक्री करता येते.
पालघर जिल्ह्यात नोव्हेंबर २०२४ च्या शेवटच्या आठवड्यापासून शेतकरी नोंदणीला सुरुवात झाली. काही ठिकाणी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकरी नोंदणी सुरू झाली. मागील वर्षी आदिवासी विकास महामंडळांतर्गत ७० हजारांवर नोंदणी झाली सध्या ७५ हजारांच्या शेतकऱ्यांची नोंदणी झालेली असली तरी आणखी दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे शेतकरी नोंदणी वाढू शकते.
नोंदणीसाठी शेतकऱ्यांना सुरुवातीपासूनच अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सुरुवातीला सव्र्व्हर डाऊनमुळे नोंदणी रखडली, तर कुठे शेतकऱ्यांना संमतीपत्र, सहखातेदारांचे आधार कार्ड यासारख्या अटी लादून हतबल केले, तरीही शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी प्रयत्न सोडले नाहीत.