बहू आयामी “ बहुरुपी ” लोककला लोप पावण्याच्या मार्गावर  pudhari photo
पालघर

Bahurupi folk art : बहू आयामी “ बहुरुपी ” लोककला लोप पावण्याच्या मार्गावर

बहुरुपींना आर्थिक आधाराची गरज

पुढारी वृत्तसेवा

दीपक गायकवाड ः खोडाळा

पोलिसी पेहराव चढवून आणि मनोरंजनात्मक द्वयार्थी शब्द फेक, चेहऱ्यावर नकलाकारी हावभाव अशा बहु आयामी रंगछटा ल्यालेली बहुरुपी लोक संस्कृती लोप पावण्याच्या मार्गावर आहे.या कलेचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने योग्य ती उपाययोजना करून ही लोककला जिवंत ठेवण्याची नितांत गरज आहे.

बालगोपाळांना पोट धरून हसायला लावणारी बहुरुपी लोककला अगदी ऐतिहासिक कालखंडापासून चालत आलेली आहे.मात्र शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही लोककला आजच्या आधुनिक युगात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.आजही गाव खेड्यात शहरात क्वचित बहुरुपी आढळतात.पोलिसाचा वेश धारण करून गावभर मनोरंजन करतात आणि त्या बदल्यात लोक त्यांना धान्य किंवा पैसे देतात एकेकाळी ही गाव गाड्यातील ऐतिहासिक वारसा असलेली परंपरा मानली जायची मात्र आज चित्रपट गृह करमणुकीची साधने वाढल्याने बहुरुपी कलेकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.

आजच्या आधुनिक युगात अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्राम्हणीगाव येथील राहुल सावंत यांच्या कुटुंबीयांनी हा बहुरुपी व्यवसाय आजही पुढे चालू ठेवला आहे.खरतर महाराष्ट्राला इतिहासाचा आणि संस्कृतीचा फार मोठा वारसा लाभलेला आहे.त्यातील बहुरुपी ही एक कला जोपासणे गरजेचे आहे.त्यासाठी गावा गावात आलेल्या बहुरुपी लोकांना चांगली वागणूक देणे,त्या व्यक्तींना समजून घेणे महत्त्वाचे आहे.बहुरूपी गावोगावी जाऊन चला काकू चला लग्नाला चला, लेकरं बांधा खांबाला आणि कुत्रे घ्या काखेला अशा लोकप्रचलित म्हणींचा वापर करून हे कलाकार लोकांना हसवायचा प्रयत्न करतात.मात्र आता विनोद ऐकून घेण्याची मनःस्थिती मुलांमध्ये राहिली नाही.

दिवसभर गावांत फिरुनही 300 ते 400 रुपयेच मिळत असल्याने बहुरुप्याची उपासमार होत आहे.दरवर्षी एखाद दुसरा बहूरुपी गावांत येवून नकलांच्या माध्यमातून धनार्जन करत होता.मात्र यावर्षी त्यात कमालीची वाढ झाली असून बहूतांश बहूरुप्यांनी आपला मोर्चा मोखाडा तालुक्यात वळवला असल्याने त्यांना भेडसावणारी बेरोजगारी आणि उपासमारी अधोरेखित झालेली आहे.

गावातील प्रत्येक घरात जाऊन बहुरुपी आपली कला दाखवून दाद मिळवत असतात.मात्र ग्रामीण भागात पूर्वी बहुरुप्याला सन्मान मिळत असे,बहुरूपी गावात आल्यावर लहान मुले त्याच्या अवतीभोवती गोळा होत असत.बहुरूपी कलावंत गावांमध्ये आपल्या कलेच्या माध्यमातून विनोदी शैलीतून प्रबोधनात्मक सादरीकरण करून लोकांची वाहवा मिळवायचे.

डांबरीवर भुईमूग लावला, माळरानावर पाईप लाईन केली हे शब्द आता विस्मरणात जाऊ लागले आहेत.आले साहेब द्या बक्षीस नाहीतर गोळ्या घालीन शेंगदाण्याच्या आणि केस निर्दोष अशा हसवत ठेवणाऱ्या कलेच्या मोबदल्यात लोक बहुरुपीना पैसे,अन्न, धान्य देत परंतु अलिकडे लहान थोरांच्या हातात मोबाईल आल्याने बहुरुपी लोकांना याचा चांगलाच फटका बसला आहे.

पूर्वी मनोरंजनाची साधने नव्हती तेव्हा आमच्या लोककलेला खूप महत्त्व होते परंतु आता लोक तेवढी किंमत देत नाहीत.तरी सुद्धा आमची पिढीजात परंपरा खंडित होऊ नये म्हणून माझ्या घरातून मी ही परंपरा जोपासत आहे.
राहुल सावंत, बहुरुपी कलाकार, ब्राम्हणीगाव.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT